इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन
जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला. विद्युत गन आणि छर्रे वापरल्याच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोप फेटाळले असले तरी, पवन खेडा आणि प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलक करत आहेत.

जंतरमंतरवर गेल्या दोन दिवसापासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पोलिसांनी तरुणांवर लाठीचार्ज केला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यात अनेक तरुण जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी तरुणांविरोधात इलेक्ट्रिक गनचा वापर केल्याचे वृत्त आहे. मात्र, पोलिसांनी या वृत्तात काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, काँग्रेस नेते पवन खेडा यांनी याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खोचक सवाल केला आहे.
जंतरमंतरवर तरुणांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमधून खेडा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना थेट सवालच केला आहे. राष्ट्रीय राजधानीत तुमच्याच मुलांविरुद्ध बंदुका, ग्रेनेड्स आणि उघड युद्ध? अमित शाह, यानंतर पुढे काय येणार आहे? असा सवाल पवन खेडा यांनी केला आहे.
बंदी घातलेल्या बंदुकातून छर्रे
तर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या बंदुकीतून विद्यार्थ्यांवर छर्रे डागण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी छर्रे लागलेल्या विद्यार्थ्याचा फोटो दाखवला. ही दहशतवाद्यासारखी पोलिसांनी कृती असल्याचं म्हटलं आहे.
What comes next, Amit Shah – guns, grenades, and open warfare against your own children in the National Capital? https://t.co/ZpJ8042iPQ
— Pawan Khera 🇮🇳 ಪವನ್ ಖೇರಾ (@Pawankhera) July 22, 2026
पोलिसांचा खुलासा
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या आरोपाचं खंडन केलं आहे. अशा बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. दिशाभूल करणाऱ्या आहेत. रॅपिड अॅक्शन फोर्सने आंदोलकांविरोधात इलेक्ट्रिक स्टन गनचा वापर केला नाही, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून जंतरमंतरव मोठं आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी संपूर्ण दिल्ली दणाणून सोडली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नसल्याचं आंदोलकांचं म्हणँ आहे. या आंदोलनाला दोन दिवसापासून हिंसक वळण लागलं आहे. सोमवारी तर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांवर छर्रे डागल्याचे आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारला घेरलं असून दिल्ली पोलिसांनी असं घडलंच नसल्याचं म्हटलं आहे.