महाराष्ट्रातही सत्ताबदलाचा ‘बिहारी पॅटर्न’? भूकंपाची पार्श्वभूमी तयार झालीय महाराष्ट्रात? वाचा काय घडतंय?

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या बुधवारी 7 किंवा 9 जुलै रोजी होणार असल्याची चिन्हे आहेत. या विस्तारात शिवसेनेलाही सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (Union Cabinet expansion)

महाराष्ट्रातही सत्ताबदलाचा 'बिहारी पॅटर्न'? भूकंपाची पार्श्वभूमी तयार झालीय महाराष्ट्रात? वाचा काय घडतंय?
CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या बुधवारी 7 किंवा 9 जुलै रोजी होणार असल्याची चिन्हे आहेत. या विस्तारात शिवसेनेलाही सामावून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘बिहारी पॅटर्न’ राबवून महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला असून राज्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलवायचे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवायचे आणि दोन उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून सत्तेवर अंकूश ठेवायचा, असा फॉर्म्युलाही भाजपने तयार केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला संधी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Amid of Union Cabinet expansion, shivsena get chance in modi cabinet?)

‘द इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर बंद खोलीत चर्चा झाली होती. त्यातच दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येण्यावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. थेट पंतप्रधानांशीच उद्धव ठाकरे यांची युतीबाबत चर्चा झाली असून काही गोष्टींचं निरसनही झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. या भेटीनंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून भाजपशी जवळीक साधण्याचं आवाहन करतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर शिवसेना फोडण्याचा आरोप केला होता. हे पत्रं मोठ्या खुबीने लिकही करण्यात आलं होतं. या सर्व घटना भाजप-शिवसेना एकत्र येण्यासाठीच जुळवून आणल्या गेल्याचंही राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे.

नवा फॉर्म्युला काय?

शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपने आता मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजपने नवा फॉर्म्युला तयार केला आहे. या फॉर्म्युल्यानुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात आणलं जाणार आहे. त्यांच्याकडे दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. फडणवीसांवर संघाची खास मर्जी आहे. मात्र, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व भाजपवर नाराज आहे. 106 आमदार निवडून येऊनही फडणवीस यांना सरकार बनवता आलं नाही. तसेच सत्ता स्थापन करताना उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यात फडणवीस यांना अपयश आल्यानेच शिवसेना दोन्ही काँग्रेससोबत गेली. या राजकीय गेममध्ये पवार सरस ठरल्याने भाजप फडणवीसांवर नाराज आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीत बोलावलं जाणार असून ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद ठेवण्यात येणार आहे. त्याबदल्यात दोन उपमुख्यमंत्रपदं आणि एक प्रमुख खातं घेऊन शिवसेनेशी सेटलमेंट करण्याचा भाजपने फॉर्म्युला तयार केल्याचं सांगितलं जात असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

बिहार पॅटर्न काय?

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राजद आणि नितीशकुमारांच्या जेडीयूने आघाडी करून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जेडीयूला कमी जागा मिळाल्यानंतरही लालूंनी नितीशकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. मात्र, लालूंना जेल होताच नितीश कुमार यांनी भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. कार्यकाळ पूर्ण केल्यावर पुन्हा भाजपसोबत मिळून निवडणूक लढवली. या निवडणुकीत नितीशकुमारांना कमी जागा मिळाल्या होत्या. तरीही ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपद देऊन दोन उपमुख्यमंत्रीपदं भाजपने स्वत:कडे ठेवली. बिहारमध्ये भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी हे दोन नेते उपमुख्यमंत्री आहेत. हाच बिहारी पॅटर्न महाराष्ट्रात लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

राऊतांची भाषा बदलली

उद्धव ठाकरे दिल्लीत मोदींना भेटून आल्यानंतर राऊत यांची भाषाही बदलली आहे. राऊत यांनी थेट मोदींवर टीका करणं टाळलं आहे. उलट ठाकरे-मोदी भेटीनंतर ते मोदींची भलामण करताना दिसत आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राऊत आणि शिवसेनेवर शेलक्या भाषेत टीका करणं टाळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेही भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का? असा कयास वर्तवला जात आहे.

तपास यंत्रणांच्या कारवाया टाळण्यासाठी युती?

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या नेत्यांच्याही चौकशा सुरू केल्या आहेत. प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरू आहे. शिवसेनेशी संबंधित असलेले निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावर कारवाई झाली आहे. एवढेच नव्हे तर संजय राऊत यांच्या पत्नीलाही ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. भविष्यातही शिवसेनेचे नेते तपास यंत्रणाच्या रडारवर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या कारवाया टाळण्यासाठी नव्या फॉर्म्युल्यावर शिवसेना भाजपसोबत घरोबा करू शकते, असं सूत्रांनी सांगितलं.

काँग्रेसचं कारण देऊन काडीमोड?

दरम्यान, काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे. त्याआधीही निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आणि आघाडीत महत्त्वाचं स्थान दिलं जात नसल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेला दबावात ठेवण्यासाठीच काँग्रेसची ही खेळी होती. त्यामुळे आता काँग्रेसच्या स्वबळाचं कारण देऊन शिवसेना आघाडीतून बाहेर पडू शकते, असं सूत्रांनी सांगितलं.

शरद पवार अडसर?

भाजपकडून शिवसेनेला सत्ता स्थापन्याची ऑफर आली असली तरी शिवसेना ही ऑफर स्वीकारण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. शरद पवार आणि ठाकरे कुटुंबीयांचे कौटुंबीक संबंध सर्वश्रूत आहे. त्यामुळे शरद पवारांना सोडून शिवसेना आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पवारांनी सर्वाधिक मेहनत घेतली होती. शिवाय शिवसेनेसोबत काँग्रेसने यावं म्हणून पवारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींकडे शब्द टाकला होता. त्यामुळे पवारांना धोका देऊन उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या जर तरच्या वार्ता असल्या तरी येत्या 7 किंवा 9 जुलै रोजी होणाऱ्या विस्तारातच सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहे. (Amid of Union Cabinet expansion, shivsena get chance in modi cabinet?)

 

संबंधित बातम्या:

आठ राज्यपाल बदलले, केंद्रीय मंत्री आता कर्नाटकचे गव्हर्नर, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला वेग

नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलावणं, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?

(Amid of Union Cabinet expansion, shivsena get chance in modi cabinet?)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI