अमित शाहा यांना अन्नातून विषबाधा, उलट्या आणि कमजोरी… दोन नेत्यांनी काय सांगितलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कर्नाटक दौऱ्यावर असताना अन्नातून विषबाधा झाली होती. उलट्या व अशक्तपणा जाणवल्याने त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शाह यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या घटनेवर भाष्य केले. शाह यांची प्रकृती आता पूर्णपणे बरी असून ते दिल्लीला परतले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फूड पॉयजनिंग झालं आहे. उलट्या झाल्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवू लागला आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती बरी आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही अमित शाह यांना अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगितलं आहे. शाह यांना मी भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी स्वत:ला कोंडून ठेवल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे.
अमित शाह यांना कर्नाटकाच्या दौऱ्यावर असताना अन्नातून विषबाधा झाली. त्यामुळे शनिवारी त्यांनी कर्नाटकातील सर्व कार्यक्रम रद्द केले. हुबलीच्या गब्बर येथील केएलई जगदगुरू गंगाधर महास्वामीगलू मूरुसाविरमठ मेडिकल कॉलेजच्या नवीन अकादमीक बिल्डिंग आणि मेडिकल रिसर्च सेंटरचं अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. पण तब्येत बरी नसल्याने त्यांनी त्यांनी या कार्यक्रमाला येणं टाळलं. तब्येत बरी नसल्याने ते काहीकाळ हॉटेलमध्येच थांबले होते. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले, अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
आता प्रकृती ठिक
तब्येत खराब असल्याने बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एक्सांबामधील श्री बीरेश्वर कोॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार होतं. पण त्यांच्या अनुपस्थितीत प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. प्रल्हाद जोशी यांनी अमित शाह यांच्या प्रकृती माहिती दिली. अन्नातून विषबाधा झाल्याने शाह यांची तब्येत बिघडली. त्यांना उलट्या झाल्याने अशक्तपणा जाणवला. मात्र आता त्यांची प्रकृती ठिक आहे, असं जोशी म्हणाले.
मला भेटायचं होतं…
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही अमित शाह यांना फूड पॉयजनिंग झाल्याचं सांगितलं. शाहांना फूड पॉयजनिंग झालं. असं काय खाल्लं त्यांनी? अख्ख्या देशात विष पसरवून ते कुठे गेले? मी त्यांना भेटणार होतो. कुठे गेले माहीत नाही. ज्ञानेश कुमारचं प्रकरण आल्यावर त्यांनी स्वत:ला कोंडून घेतलं, असं राऊत म्हणाले. राऊत यांनी यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.