क्रेझ… क्रेझ… क्रेझ… एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीतही क्रेझ… एक झलक पाहण्यासाठी तरुण तरुणी विमानतळावर

| Updated on: Nov 26, 2022 | 11:39 AM

आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झलक पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. महाराष्ट्रातून गुवाहाटीत फिरायला आलो आहोत. ही पर्वणी घालवायची नव्हती.

क्रेझ... क्रेझ... क्रेझ... एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीतही क्रेझ... एक झलक पाहण्यासाठी तरुण तरुणी विमानतळावर
क्रेझ... क्रेझ... क्रेझ... एकनाथ शिंदे यांची गुवाहाटीतही क्रेझ...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गुवाहाटी: आधी केवळ ठाणे जिल्ह्यापूरतेच मर्यादित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करताच अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. शिंदे यांनी 50 आमदारांना घेऊन आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर महाराष्ट्रात आले आणि थेट मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शिंदे यांच्याकडे सर्व मीडियाचा फोकस राहिला अन् शिंदे अचानक लोकप्रिय झाले. या घडामोडीनंतर शिंदे यांची तरुण आणि तरुणींमध्येही क्रेझ निर्माण झाली. इतकेच काय केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुवाहाटीतही एकनाथ शिंदे यांची क्रेझ असल्याचं दिसून येत आहे. आज त्यांच्या स्वागतासाठी अनेक लोकांनी गुवाहाटीच्या विमानतळावर दाखल होऊन घोषणाबाजी केली. त्यात तरुण आणि तरुणींचाही सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार, खासदार, मंत्री थोड्याच वेळात गुवाहाटी विमानतळावर पोहोचणार आहे. शिंदे येणार असल्याने गुवाहाटीच्या विमानतळावर रेड कार्पेट टाकण्यात आलं आहे. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे आसाम सरकारचे गेस्ट असल्याने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा गुवाहाटीला येणार असल्याने त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर गर्दी केली आहे. शिंदे यांच्या चेहऱ्याचे मुखवटे लावून एकनाथ शिंदे जिंदाबादच्या घोषणाही हे कार्यकर्ते देत आहेत. महाराष्ट्र की शान एकनाथ शिंदे जिंदाबाद… अशा घोषणा देऊन या कार्यकर्ते आणि शिंदे यांच्या समर्थकांनी संपूर्ण विमानतळ परिसर दणाणून सोडला आहे.

गुवाहाटी फिरण्यासाठी आलेल्या काही मराठी तरुणांनीही गुवाहाटी विमानतळावर हजेरी लावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक झलक पाहण्यासाठी हे मराठी तरुण तरुणी गुवाहाटी विमानतळावर सकाळपासूनच हजर झाले आहेत. विशेष म्हणजे आज गुवाहाटीला फिरण्याचं रद्द करून हे तरुण शिंदे आणि काय झाडी, काय डोंगार फेम शहाजीबापू पाटील यांची झलक पाहण्यासाठी विमानतळावर हजेरी लावली आहे.

आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झलक पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. महाराष्ट्रातून गुवाहाटीत फिरायला आलो आहोत. ही पर्वणी घालवायची नव्हती. त्यामुळे बऱ्याच वेळापासून विमानतळावर मुख्यमंत्र्यांची वाट पाहत थांबलो आहोत, असं एका तरुणीने सांगितलं.

गुवाहाटीतून नव्या सरकारची सुरुवात झाली होती. त्यामुळे आम्ही गुवाहाटी फिरायला आलो. आम्ही ट्रिपला आलो तेव्हा काय झाडी, काय डोंगार हा शहाजीबापूंचा डायलॉग आठवला. त्यामुळे आम्हाला त्यांना भेटायची उत्सुकता आहे. त्यासाठीच इथे आल्याचं दुसऱ्या तरुणीने सांगितलं.

तर, आम्ही चौघे जण आहोत. आमचे मुख्यमंत्री येत आहेत. त्यांना भेटण्याची उत्सुकता आहे. आम्हाला गुवाहाटीत फिरताना शहाजीबापूंची आठवण येते, असं एका तरुणाने सांगितलं. आमचं आठवडाभरापासून गुवाहाटी फिरून झालं. आम्हाला आता मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळते त्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असं आणखी एका तरुणाने सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ महाराष्ट्राची शान नाहीत. तर ते हिंदुत्वाची शान आहेत. त्यामुळेच त्यांना भेटायला. त्यांना पाहायला आणि त्यांचं स्वागत करायला आम्ही इथे आलो आहोत, असं स्वागत करण्यासाठी आलेल्या आसामच्या तरुणाने सांगितलं.