मी बाबांनाही संपवलं, तू तर.. जयपूर आयुषी शर्मा प्रकरणात नवं वळण; मामांच्या तक्रारीनंतर वडिलांच्या मृत्यूचाही तपास सुरू

Ayushi Sharma Inside Story : जयपूरमधील नीरज शर्मा हत्या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. राकेश शर्मा यांनी त्यांची अटक झालेली पुतणी आयुषी हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने वडीलांनाी संपवल्याचा आरोप आहे. चुलतभावाच्या मदतीने तिने हे कांड केल्याच बोललं जात आहे. या हत्याकांडामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मी बाबांनाही संपवलं, तू तर.. जयपूर आयुषी शर्मा प्रकरणात नवं वळण; मामांच्या तक्रारीनंतर वडिलांच्या मृत्यूचाही तपास सुरू
जयपूर हत्याकांड
| Updated on: Jul 11, 2026 | 8:20 AM

Jaipur Ayushi Sharma Case Update : जयपूरमधील बहुचर्चित नीरज शर्मा हत्या प्रकरणात एक धक्कादायक दावा समोर आला आहे. आईच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एलएलबीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थिनी आयुषीविरोधात आता तिचे सख्खे मामा राकेश शर्मा यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, आयुषीने आईची हत्या करण्यापूर्वी एप्रिल 2025 मध्ये वडील विजय शर्मा यांचाही जीव घेतला होता. चुलत भाऊ बलरामच्या मदतीने तिने हे कृत्य केल्याचा आरोप असून यानंतर जयपूर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

राकेश शर्मा यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आयुषीचे वडील, विजय शर्मा दीर्घकाळापासून आजारी होते. त्या काळात आयुषीचा चुलत भाऊ बलराम त्यांच्या घरी राहत होता. आयुषी वडिलांवर योग्य उपचार होऊ देत नव्हती, असा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र उपचारांमुळे विजय शर्मा यांची प्रकृती सुधारल्यानंतर ते घरी परतले होते. असं असलं तरी काही काळाने आयुषीने कुटुंबीयांना सांगितलं की, एका नामांकित डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर वडिलांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. त्यानुसार ती आणि बलराम विजय शर्मा यांना घेऊन गेले. पुढील सुमारे तीन महिने त्यांनी विजय शर्मा कुठे आहेत, याची माहिती कुटुंबीयांपासून तिने लपवून ठेवली. नीरज शर्मा यांनी वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांना केवळ एवढीच माहिती देण्यात आली की, विजय शर्मा दिल्ली रोडवरील निम्स (NIMS) रुग्णालयात उपचार घेत आहेत.

अवयव निकामी, घरी आल्यावर मृत्यू

याचदरम्यान आयुषीची आई, नीरज शर्मा यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्या स्वतः त्यांच्या पतीला भेटण्यासाठी जाऊ शकल्या नाहीत. . काही दिवसांनी आयुषीने मेसेज पाठवला की, तिचे वडील, विजय शर्मा हे निविक रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये (ICU) आहे. जेव्हा कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, विजय शर्मा यांच्या शरीरातील सुमारे ९० टक्के अवयव निकामी झाल्याची माहिती दिली. त्यानंतर आयुषी त्यांना घरी घेऊन आली आणि काही काळातच त्यांचे निधन झाले.

वडिलांना संपवलं तर तू कोण लागून गेलीस ?

यानंतर आयुषीचे मामा राकेश शर्मा यांनी आणखी एक गंभीर आरोप लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आईसोबत झालेल्या वादादरम्यान आयुषीने धमकी दिली होती “वडिलांच्या फीडिंग ट्यूब काढून त्यांना संपवलं, मग तू कोण आहेस? तुलाही दोन दिवसांत संपवते,” अशा शब्दांत तिने धमकावल्याचा आरोप मामांनी केला. या कथित धमकीनंतर घाबरलेल्या नीरज शर्मा यांनी आपल्या WhatsApp स्टेटसवर, “माझ्या आयुष्यात आता फक्त दोन दिवस उरले आहेत,” असं लिहीलं होतं, असा दावाही त्यांनी केला आहे.

हत्येमागचं कारण

पोलीस आणि कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुहेरी हत्येमागे सरकारी नोकरी मिळवणे आणि कुटुंबाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेणे हा मुख्य हेतू असल्याचा संशय आहे. मृत विजय शर्मा हे राजस्थान उच्च न्यायालयात कोर्ट मास्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनीच आयुषी आणि तिचा चुलत भाऊ बलराम यांना एलएलबीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली होती, जेणेकरून दोघेही वकिलीच्या क्षेत्रात करिअर करू शकतील. आयुषीचे मामा राकेश शर्मा हे देखील यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयात एलडीसी (लोअर डिव्हिजन क्लर्क) म्हणून कार्यरत होते.

वडिलांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्याऐवजी आयुषीने त्यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तयारी सुरू केली होती, असा आरोप राकेश शर्मा यांनी केला. याचबरोबर कुटुंबाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचाही तिचा प्रयत्न होता असं म्हटलं जात आहे.

 

Follow Us