
भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील जनतेला आधार दिला आहे. अशातच आता या योजनेत मिळणाऱ्या कव्हरमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी PM-JAY योजनेत कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मिळत होता, मात्र आता 10 लाखांपर्यंतचा कव्हर मिळणार आहे. देशातील लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आयुष्मान भारत ही मोदी सरकारची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेद्वारे देशातील गरीब जनतेला आरोपग्यविमा दिला जातो. यामुळे गंभीर आजारावरील उपचार मोफत किंवा कमी पैशांमध्ये केले जातात. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांचे कॅशलेस कव्हर मिळते. देशातील हजारो रुग्णालयांमध्ये याच्या माध्यमातून उपचार घेता येतात. या योजनेत सर्व गंभीर आजारांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होत आहे.
या योजनेअंतर्गत कुटुंबातील पती-पत्नी, मुले (नवजात बालके), पालक, आजी-आजोबा, भावंडे, सासू-सासरे आणि कुटुंबासोबत राहणाऱ्या इतर सदस्यांच्या उपचारासाठी 5 लाखांचे कव्हर मिळते. सरकारने या योजनेत एक बदल केला आहे. आता 70 वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. जर एखादे कुटुंबाने या योजनेसाठी आधीच नोंदणी केली असेल आणि त्या घरात एखाद्या सदस्याचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्यांना अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल. अशाप्रकारे या कुटुंबाला 10 लाखांचे कव्हर मिळेल.
10 लाखांचे कव्हर मिळवण्यासाठी व्यक्तीचे वय 70 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. संबंधित वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड सादर करावे लागेल. यासाठी पात्र व्यक्तींना आधार ईकेवायसी पुन्हा करावी लागेल. त्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी कमाल वयाची कोणतीही अट नाही. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या देखील पूर्ण फायदे मिळतात. मोठी शस्त्रक्रिया, अवयव प्रत्यारोपण अशा उपचारासाठीही हे कव्हर मिळते.