ज्योतीपेक्षाही खतरनाक होती माधुरी; UPSC टॉपर कशी बनली पाकिस्तानी एजंट?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. ज्योतीच्या प्रकरणामुळे भारतीय राजदूत माधुरी गुप्ताचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. एका पाकिस्तानीच्या प्रेमात पडल्यानंतर तिने हेरगिरी करायला सुरुवात केली होती.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्रासह जवळपास 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय सैन्याची संवेदनशील माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली ज्योतीला अटक करण्यात आली. ज्योतीमुळे माधुरी गुप्ताचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. भारतीय राजदूत असलेली माधुरी एका पाकिस्तानीच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी करायला सुरुवात केली होती. माधुरी गुप्ता ही पाकिस्तानातील इस्लामाबाद इथल्या भारतीय उच्चायुक्तालयात द्वितीय सचिव म्हणून कार्यरत होती. पाकिस्तानी माध्यमांचं विश्लेषण करणं आणि ती विश्लेषणं दिल्लीत परत पाठवण्याचं तिचं काम होतं. माधुरीने 27 वर्षे देशाची सेवा केली. त्यामुळे तिच्यावरील हेरगिरीचा आरोप सिद्ध होईल यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता.
26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या दीड वर्षानंतर भारतीय गुप्तचर विभागाचे तत्कालीन संचालक राजीव माथूर यांना इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील एक व्यक्ती पाकिस्तानसाठी गुप्तहेर बनल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती. ती व्यक्ती भारताबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स एजन्सीला (आयएसआय) देत असल्याचं त्यांना समजलं होतं. तेव्हा रडारवर माधुरी गुप्ताच होती. 2010 च्या सुरुवातीला गुप्तचर यंत्रणेनं तिच्यावर बारकाईने नजर ठेवली होती. माधुरीबद्दलच्या धक्कादायक माहितीबद्दल पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी एक गुप्त मोहीम सुरू केली होती. यादरम्यान तिला जाणूनबुजून खोटी माहिती देण्यात आली होती.




माधुरीने प्रेमापोटी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं नंतर तपासकर्त्यांनी उघड केलं. त्यावेळी माधुरी जमशेद किंवा जिम नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. जिम आयएसआयसाठी काम करत होता. माधुरीने केवळ गोपनीय कागदपत्रेच शेअर केली नाहीत तर भारतात काम करणाऱ्या गुप्तचर अधिकाऱ्यांची नावं आणि ईमेल पासवर्डसुद्ध लीक केले होते. तिच्याविरोधात सर्व पुरावे गोळा केल्यानंतर सार्क शिखर परिषदेच्या तयारीच्या बहाण्याने माधुरीला दिल्लीला बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली होती. माधुरीने देशाच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची माहिती पाकिस्तानला दिली होती. त्यानंतर 2021 मध्ये वयाच्या 64 वर्षी तिचं निधन झालं.