
Bengaluru blast | कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये रामेश्वरम कॅफे येथे शुक्रवारी बॉम्ब स्फोट झाला. या स्फोटात 9 जण जखमी झाले आहेत. कॅफेमध्ये बॉम्ब स्फोट होण्याच्या काही मिनिट आधी पाटनाचे सॉफ्टवेअर इंजिनिअर कुमार अलंकृत तिथे उपस्थित होते. अलंकृत यांनीच कॅफेमध्ये झालेल्या ब्लास्टचा पहिला व्हिडिओ शेअर केला. बॉम्ब स्फोटाच्या या घटनेबद्दल बोलताना अलंकृत म्हणाले की, “मी माझी ऑर्डर घेतली होती. अचानक माझ्या आईचा फोन आला. मी फूड काऊंटरपासून 10-15 मीटर अंतरावर चालत गेलो. काही सेकंदांनी मोठा आवाज ऐकू आला. सर्वत्र धूर होता”
‘अशा प्रकारची भीतीदायक, भीषण स्थिती मी याआधी कधी पाहिलेली नाही’ असं अलंकृतने सांगितलं. ते रामेश्वरम कॅफेच्या व्हाइटफील्ड ब्रांचमध्ये लंच करण्यासाठी गेले होते. या स्फोटात 9 जण जखमी झाले. ब्लास्टमध्ये 15 पेक्षा जास्त लोक जखमी झाले असा अलंकृतचा दावा आहे. ‘काही लोक जळालेले, काहींच्या कानातून रक्त येत होतं’ असं अलंकृतने सांगितलं. 24 वर्षाचा अलंकृत बंगळुरुमध्ये सॉफ्टवेयर इंजीनियर आहे. ब्रूकफील्ड येथे तो भा्डयाच्या घरात राहतो. त्याच्या घरापासून काही अंतरावरच रामेश्वरम कॅफे आहे.
एकच पळापळ सुरु झाली
“मी एक इडली आणि डोसा ऑर्डर केला होता. इडली संपल्यानंतर मी डोसा काऊंटरवर गेलो. मी अनेकदा डोसा पिकअप पॉइंटच्या भागात बसतो. पण आज जसा मी डोसा घेतला, तितक्यात मला आईचा फोन आला. कॅफेच्या आत भरपूर आवाज होता. म्हणून मी बाहेर गेलो. आईशी मी बोलत होतो, तितक्यात पाठिमागे अचानक मोठा आवाज झाला. एकच पळापळ सुरु झाली. लोकांची मोठी गर्दी बाहेर आली. इतका मोठा स्फोटाचा आवाज मी कधी ऐकलेला नाही” असं अलंकृतने सांगितलं.
आरोपीला शोधण्यासाठी या पॉवरफुल टेक्नोलॉजीचा वापर
कॅफेमध्ये आलेल्या एका अज्ज्ञात व्यक्तीने बॅग ठेवली आणि तो निघून गेला. या स्फोटासाठी IED चा वापर करण्यात आला. हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. रामेश्वरम कॅफेमध्ये जो व्यक्ती बॅग ठेवून गेला, त्याला शोधून काढण्यासाठी चेहरा ओळखणाऱ्या AI च्या पावरफुल टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार आहे.