Ajit Pawar | पुण्यातील माजी आमदाराला अजितदादांवर विश्वास, म्हणतो, ‘ते माझ्यावर….’
Ajit Pawar | काही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मनाविरुद्ध दिल्यास स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो. त्याची झलक आताच दिसू लागली आहे. स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन समजूत काढताना महायुतीच्या नेत्यांचा कस लागणार आहे.

पुणे (रणजीत जाधव) : सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. निवडणूक आयोग पुढच्या दोन आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करु शकतो. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. महाविकास आघाडीत कुठला पक्ष, किती जागांवर लढणार ते जवळपास निश्चित झालय. महायुतीमध्ये मात्र अजून चित्र स्पष्ट होत नाहीय. काही जागांवरुन महायुतीमध्ये मोठा पेच आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आहेत. उदहारणार्थ सिंधुदुर्ग, शिरुर या लोकसभा मतदारसंघांवरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन समजूत काढताना महायुतीच्या नेत्यांचा कस लागणार आहे. महायुतीने लोकसभेसाठी मिशन 45 च उद्दिष्ट्य ठेवलं आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.
पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरलाय. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर कोण असणार हे अद्याप अस्पष्ट आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघावर सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांकडून दावा सांगितला जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. त्यामुळे ते या जागेवर दावा सांगत आहेत. त्याआधी इथून शिवसेनेचा खासदार होता. शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मनाविरुद्ध दिल्यास स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो. त्याची झलक आताच दिसू लागली आहे.
अमोल कोल्हे माझ्यामुळे खासदार, या आमदाराचा दावा
राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार गटाकडून लढण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी इच्छा व्यक्त केलीय. दुसरीकडे अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावान असलेले माजी आमदार विलास लांडे हे अद्यापही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. अजित पवार त्यांना खासदारकीची उमेदवारी देतील अशी अजूनही आशा आहे. 2019 च्या लोकसभेच्या वेळी अमोल कोल्हे यांना ऐनवेळी पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली, चार महिने अगोदरच अजित पवारांनी तयारी करण्यास सांगितली असल्याने विलास लांडे यांनी शिरूरमध्ये राजकिय वातावरण निर्मिती केली आणि याचाच फायदा अमोल कोल्हे यांना झाला आणि ते माझ्याचमुळे खासदार झाले असं विधान विलास लांडे यांनी केलय. अजित पवार हे माझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय, मात्र, उमेदवारी न दिल्यास पुढची दिशा ठरवू असा सूचक इशाराही त्यांनी अजित पवारांना दिलाय.
