
या वर्षात जगानं अनेक संघर्ष पाहिले, इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षांपासून युद्ध सुरूच आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष देखील शिगेला पोहोचला होता, पाकिस्तानने भारतावर अयशस्वी हल्ल्याचा प्रयत्न केला तर प्रत्यु्त्तर म्हणून भारतानं केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं आहे. इस्रायल आणि गाझामध्ये देखील युद्ध सुरूच होतं, दरम्यान त्यानंतर आता जगात आणखी दोन देश आमने-सामने आले आहेत. चीन आणि तैवानमध्ये सुरुवातीपासूनच संघर्ष सुरू आहे, चीनकडून अनेकदा तैवानवर दावा करण्यात आला आहे, चीनने अनेकदा तैवानच्या हद्दीमध्ये लढाऊ विमानं देखील घुसवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे जर कोणत्याही देशानं तैवानची बाजू घेतली तर चीन सातत्यानं आक्रमक भूमिका घेत असल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान आता चीन आणि जपानमध्ये नवा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी तैवान संदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं. जपानच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर चीन आता चांगलाच नाराज झाला आहे, चीनने मोठा निर्णय घेतला आहे, एकाही चीनी नागरिकाने सध्या जपानचा दौरा करू नये अशी अॅडव्हायजरी चायनाकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
जपानच्या नव्या पंतप्रधान साने ताकाइची यांनी जपानच्या संसदेमध्ये बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. जर चीनने तैवानवर हल्ला केला तर हा जपानच्या देखील अस्तित्वाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही थेट सैन्य कारवाई देखील करू शकतो, असा इशारा साने ताकाइची यांनी चीनला दिला आहे, त्यामुळे चीनने देखील आता या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली असून, तातडीनं आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी लागू केली आहे. चीनच्या कुठल्याही नागरिकाने सध्या जपानचा दौरा करू नये असं चीनने म्हटलं आहे. तैवान हा चीनसाठी सर्वात महत्त्वाचा विषय आहे, मात्र आता पहिल्यांदाच एखाद्या देशानं यावर चीनला थेट इशारा दिला आहे, त्यामुळे आता तणाव वाढत आहे, तणाव वाढला तर परिस्थिती आणखी गंभीर बनू शकते.