‘500 कोटी द्या अन् मुख्यमंत्रीपद मिळवा’, माजी मंत्र्याच्या विधानाने संपूर्ण देशात खळबळ

Navjot Kaur Sidhu : पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांच्या एका विधानाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात असं कौर यांनी म्हटल्याने आता काँग्रेसवर टीका होताना दिसत आहे.

500 कोटी द्या अन् मुख्यमंत्रीपद मिळवा, माजी मंत्र्याच्या विधानाने संपूर्ण देशात खळबळ
navjot kaur sidhu
Image Credit source: Google
| Updated on: Dec 08, 2025 | 7:21 PM

काँग्रेसच्या नेत्या आणि पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात असं नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप आणि आम आदमी पार्टीने यामुळे काँग्रेसची कार्यपद्धतीचे काळे सत्य समोर आल्याचे आणि हा पक्ष पद विकत असल्याचे म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नवज्योत कौर यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, ‘जर काँग्रेसने पंजाबमध्ये आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले तर माझे पती पुन्हा सक्रिय राजकारणात येतील. पंजाबच्या निवडणुका 2027 मध्ये होणार आहेत. आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबच्या लोकांच्या हिताचा विचार करतो. पण मुख्यमंत्री होण्यासाठी आमच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत.’ नवज्योत कौर यांच्या या विधानावरून हे स्पष्ट होते की ज्या व्यक्तीकडे 500 कोटी रुपये असतील त्या व्यक्तीला काँग्रेसची सत्ता असल्यास मुख्यमंत्रीपद मिळते.

आम आदमी पक्षाने काय म्हटले ?

नवज्योत कौर यांच्या विधानावर सत्ताधारी आम आदमी पार्टीने भाष्य केले आहे. आपचे सरचिटणीस बलतेज पन्नू यांनी एक निवदन जारी करत म्हटले की, ‘नवज्योत कौर सिद्धू यांनी दोन स्फोटक दावे केले आहेत. पहिला दावा म्हणजे, जर काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले तरच ते पंजाबच्या राजकारणात सक्रीय होतील. दुसरा दावा म्हणजे सिद्धू यांच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत. याचा अर्थ असा की काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात.

पुढे बोलताना पन्नू यांनी म्हटले की, ‘सिद्धू यांच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत, मग इतके पैसे कोणत्या नेत्याकडे आहेत? हे पैसे कुठे जातात? राज्य युनिट अध्यक्षांकडे? हायकमांडकडे? राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे? पंजाबच्या लोकांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.’

भाजपचीही टीका

नवज्योत सिद्धू यांच्या विधानावर भाजपचे पंजाब युनिटचे अध्यक्ष सुनील जाखड यांनीही भाष्य केले आहे. ते 2022 साली काँग्रेसमधून भाजपात आले होते. ते म्हणाले की, ‘काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी अनेक निकष आहेत. मी नवजोत कौर यांचे 500 कोटी रुपयांचे विधान ऐकले. मात्र मी ऐकले होते की मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी 350 कोटी रुपये लागतात.

या प्रकरणावर बोलताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनी म्हटले की, ‘नवजोत कौर यांनी पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाची किंमत 500 कोटी रुपये आहे आणि ते इतके पैसे देऊ शकत नाहीत असं जाहीरपणे सांगितले आहे. यामुळे काँग्रेसमधील पैशाच्या ताकदीचे राजकारण उघड झाले आहे. आता यावर स्पष्टीकरण देताना नवज्योत कौर यांनी माझ्या वक्त्व्याचा विपर्यास केला असं म्हटलं आहे.