
दिल्ली ब्लास्ट प्रकरणातील दुसरी DL10CK0458 नंबरची संशयीत EcoSport कार अखेर पोलिसांना सापडली आहे. फरिदाबाद पोलिसांना या कारचा शोध घेण्यात यश आलं आहे, ही कार खंदावली गावाजवळ पार्क करण्यात आली होती. ही कार उमरच्या नावावर आहे. उमर हा या कारचा दुसरा मालक आहे. तर या कारचा पहिला मालक हा देवेंद्र नावाचा व्यक्ती आहे. दरम्यान ज्या कारमध्ये स्फोट झाला होता, त्या कारच्या मालकांमध्ये देखील देवेंद्र हे नाव समोर आलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही कार संबंधात ज्या व्यक्तीचं देवेंद्र म्हणून नाव समोर आलं आहे, तो व्यक्ती खरच देवेंद्र आहे की, आणखी कोण? याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.
तर दुसरीकडे दिल्ली ब्लास्ट प्रकरणात उमरबाबत देखील महत्त्वाची माहिती समोर आली आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्फोटापूर्वी उमर नबी हा दिल्लीच्या कमला मार्केटमध्ये असलेल्या एका मशिदीमध्ये गेला होता. तिथे तो अंदाजे दहा मिनिटं थांबला होता. त्यानंतर तो लाल किल्ल्याच्या दिशेनं निघाला. दरम्यान दिल्ली स्फोट प्रकरणाचा प्रत्येक अँगल सध्या तपासला जात असून, या प्रकरणात आणखी काही खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
लेडी डॉक्टर शाहीन संदर्भात मोठा खुलासा
दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर आता तपास यंत्रणांकडून दहशतवादी संघटना असलेल्या जैश -ए- मोहम्मदच्या फरीदाबाद मॉड्यूल टेरर फंडिंग प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लेडी डॉक्टर शाहीनला जैश- ए मोहम्मदकडून फंडिंग होत होती, आणि जौशे मोहम्मदच्या इशाऱ्यानुसारच ती उत्तर प्रदेशात महिला विंगसाठी रिक्रूटमेंट करत होती. दरम्यान दुसरीकडे शाहीन, आदिल, उमर आणि मुजम्मिल यांच्या बँक खात्याची तपासणी करण्यात आली आहे, त्यामध्ये त्यांना विदेशातून फंडिंग झाल्याचे पुरावे सापडले आहेत. आता या प्रकरणात लेडी डॉक्टर शाहीनची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यात आहे. दिल्लीमध्ये सोमवारी भीषण स्फोट झाला होता, या स्फोटामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला.