बुलेट ट्रेनबाबत महत्वाची अपडेट, ‘या’ महत्वाच्या कामाला लवकरच सुरुवात
बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रकल्पावर काम करत आहे. आता बुलेट ट्रेनच्या कामाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रकल्पावर काम करत आहे. अशातच आता बुलेट ट्रेनच्या सिग्नल यंत्रणेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गावर अत्याधुनिक सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टम बसवण्याचे कंत्राट दिनेशचंद्र आर अग्रवाल (डीआरए) इन्फ्रॅकॉन प्रायव्हेट लिमिटेड, सीमेन्स लिमिटेड आणि सीमेन्स मोबिलिटी जीएमबीएच या कंपन्यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच सिग्नल यंत्रणेच्या कामाला सुरुवात होणार आहे.
सीमेन्स लिमिटेडने बुलेट ट्रेनच्या सिग्नल यंत्रणेच्या कराराबाबत एक प्रेस रिलीज जारी केले आहे. यानुसार सुमारे 4100 कोटी रुपयांच्या या करारातील 1230 कोटी रुपयांचे काम सीमेन्स लिमिटेड करणार आहे. हा करार सिग्नल सिस्टम आणि टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाची स्थापना आणि देखभालीसाठी आहे. हे काम 54 महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर कंपनी 15 वर्षांसाठी देखभाल करणार आहे.
जपानमध्ये बुलेट ट्रेनची चाचणी सुरू
बुलेट ट्रेनची चाचणी जपानमध्ये सुरू झाली आहे. जपान भारताला E5 आणि E3 सीरिजमधील 2 शिंकानसेन ट्रेन सेट भेट देणार आहे. हे सेट 2026 सुरुवातीला भारतात पोहोचण्याती शक्यता आहे. या गाड्या 320 किमी प्रति तास वेगाने धावणार आहेत. सध्या जपानमध्ये चाचणी सुरु असली तरी, गाड्या भारतात पोहोचल्यानंतर देशाच्या भौगोलिक आणि हवामान परिस्थितीनुसार आणखी चाचण्या कराव्या लागणार आहेत. सर्व चाचण्या पार पडल्यानंतर बुलेट ट्रेन धावण्यास तयार होणार आहे.
‘या’ स्थानकांवर बुलेट ट्रेन थांबणार
बुलेट ट्रेन ही मुंबई-अहमदाबाद या शहरांदरम्यान धावणार आहे. ही ट्रेन ठाणे, विरार, बोईसर, वापी, सुरत आणि वडोदरा यासह एकूण 12 स्थानकांवर थांबणार आहे. या ट्रेनमुळे 7 तासांचा प्रवास फक्त 2 तास 7 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. 2016 मध्ये भारत आणि जपानमध्ये झालेल्या करारानुसार जपान स्वस्त व्याजदराने या प्रकल्पाच्या खर्चाच्या सुमारे 80% रक्कम भारताला देत आहे.
बुलेट ट्रेनमुळे देशात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. तसेच पर्यटन आणि व्यवसायालाही चालना मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भारतात जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीचे एक नवीन युग सुरू होणार आहे. या प्रकल्पानंतर भारतातील इतर अनेक शहरादरम्यानही बुलेट ट्रेन सुरु होण्याची शक्यता आहे.