
बिहारमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा मोठा विजय झाला आहे, तर महाआघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे, बिहार निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, निवडणूक निकालानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला असून, त्यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारच्या लोकांनी विकसित आणि समृद्ध बिहारसाठी मतदान केलं आहे. निवडणुकीवेळी मी जनतेला रेकॉर्ड व्होटिंग करण्याचा आग्रह केला होता. आणि बिहारच्या जनतेने सर्व विक्रम मोडले आहेत. मी बिहारच्या लोकांना एनडीएला प्रचंड विजय देण्याचा आग्रह धरला होता. बिहारच्या जनतेने माझा आग्रह मानला. बिहारने २०१० नंतरचा सर्वात मोठा जनादेश एनडीएला दिला आहे. मी खूप विनम्रपणे एनडीएच्या सर्व पक्षाच्या वतीने बिहारच्या महान जनतेचे आभार मानतो, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मी बिहारच्या महान जनतेला आदरपूर्वक नमन करतो. मी आज लोकनायक जयप्रकाश नारायण, भारत रत्न कर्पुरी ठाकूर यांनाही आदरपूर्वक नमन करतो. कर्पूरी ठाकूर यांच्या गावातून मी बिहारमध्ये निवडणूक मोहीम सुरू केली आहे. आजचा विजय आपल्याला संकल्पित करायला सांगतो की, बिहारच्या विकासाला नव्या उंचीवर घेऊन जा. हा मोठा विजय देत आणि अतूट विश्वास व्यक्त करत बिहारच्या लोकांनी धुरळाच उडवून दिला आहे. आज बिहारच्या घराघरात मखानेची खीर होणार आहे. मला आनंद याचा आहे की, या ठिकाणीही मखान्याची खीर सर्वांना देण्यात आली आहे. आम्ही तर जनता जनार्दनाचे सेवक आहोत. आम्ही आपल्या मेहनतीने जनतेचं हृदय खूश करत असतो. आम्ही तर जनता जनार्दनाचं हृदय चोरून बसलेलो आहोत. त्यामुळे संपूर्ण बिहारने दाखवून दिलंय की पुन्हा एकबार एनडीए सरकार.
मी निवडणुकीत वारंवार सांगितलं होतं. बिहारच्या निवडणुकीत मी जेव्हा जंगलराजवर बोलायचो. कट्टा सरकारवर बोलायचो तेव्हा आरजेडीचे लोक विरोध करत नसायचे. पण काँग्रेसवाल्यांना झोंबायचं. मोदी असं काय म्हणतात? असं ते म्हणायचे. पण आता परत सांगतो. आता परत कट्टा सरकार येणार नाही, असा हल्लाबोल यावेळी मोदी यांनी केला आहे.