
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 243 जागांवर झालेल्या मतदानाचे निकाल येऊ लागले आहेत. प्राथमिक कलानुसार या निवडणुकीत भाजप- नितीशकुमार यांच्या एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर काँग्रेस-आरजेडीच्या महाआघाडीचा सुपडा साफ झालेला दिसत आहे. या निवडणुकीत महिलांनी भरभरून मतदान केल्याने एनडीएच्या हाती पुन्हा एकदा बिहारची सत्ता गेली आहे. त्यामुळे एनडीएचा सत्तेत राहण्याचा विक्रमही होणार आहे. त्यासोबतच निवडणूक आयोगानेही पहिल्यांदाच अनोखा विक्रम केला आहे. आजवरच्या इतिहासात बिहारमध्ये पहिल्यांदाच निवडणुकीच्यावेळी कोणतीही हिंसा झाली नाही. हा सुद्धा एक विक्रमच आहे. यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक सुधारणाही करण्यात आल्या. त्यामुळेच हिंसा मुक्त मतदान झाल्याचं दिसून आलं आहे. एकंदरीत जंगलराज ही बिहारची इमेज बदलताना दिसत आहे.
1985 पासून ते 2005 च्या काळाला भाजप आणि जेडीयूकडून जंगलराज संबोधलं जातं. या काळात बिहारमध्ये सातत्याने निवडणुकीत हिंसा होत होती. तसेच पुनर्मतदान होत होतं. पण 2025मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच एकही हिंसा झाली नाही. बिहारमध्ये मतदान शांततेत पार पडलं. विशेष म्हणजे 243 जागांपैकी एकाही जागेवर री-पोलची वेळ आली नाही. म्हणजे पुन्हा मतदान करण्याची वेळ आली नाही. निवडणूक आयोगाचं हे सर्वात मोठं यश आहे.
SIR वरून गोंधळ
गेल्या 30 वर्षात यंदा पहिल्यांदाच बिहारमध्ये मतदानावेळी एकही हिंसा झाली नाही. मात्र, मतदानावेळी गोंधळ झालेला मात्र पाहायला मिळालं. एसआयआर म्हणजे मतदार यादी शुद्धीकरणावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला चांगलंच घेरलं होतं. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. बरेच आरोप झाल्यानंतरही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपलं म्हणणं पत्रकार परिषदेत मांडलं. एसआयआरद्वारे मतदानात गडबड झाल्याचा आरोप केला गेला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या मते, शांततेत पार पडलेली ही पहिलीच निवडणूक आहे. दोन टप्प्यातील मतदानावेळी राज्यात कोणतीही हिंसा झाली नाही.
हिंसा नेहमीच व्हायची
बिहार निवडणुका आणि हिंसा हे एक समीकरणच होतं. हिंसेमुळे तर अनेकदा मतदान रद्दही करावं लागायचं. अनेक ठिकाणी मतदान केंद्राला छावणीचं स्वरुप यायचं. बऱ्याचदा तर या हिंसाचारात लोकांना आपला जीवही गमवावा लागायचा. निवडणूक आयोगाच्या आकड्यांकडे पाहिले तर 1985च्या विधानसभा निवडणुकीत भयंकर हिंसा झाली होती. या हिंसेत 65 लोकांचा मृत्यू झाला होता. निवडणूक आयोगाला 156 जागांवर पुन्हा मतदान करावं लागलं होतं. तर 1990च्या विधानसभा निवडणुकीतही प्रचंड हिंसा झाली. यावेळी 87 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. 1990मध्ये लालू प्रसाद यादव पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते.
1995 मध्ये टीएन शेषन यांचा हंटर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात 1995ची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली. 95मध्ये निवडणुकीची घोषणा होताच संपूर्ण राज्यात प्रचंड हिंसा झाली. मतदानाच्या दिवशी प्रचंड गडबड करण्यात आली. अनेक मतदान केंद्रावर हिंसा झाली. हिंसाचारामुळे तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांनी एकदा दोनदा नाही तर चार वेळा निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. हे बिहारसाठीचं अराजकतेचं वर्ष ठरलं. त्यानंतर टीएन शेषण यांनी त्यांचा हंटर चालवला. निवडणूक प्रक्रियेत अनेक सुधारणा घडवून आणल्या. त्यामुळे निवडणूक प्रक्रियाही सुधारली. तसेच या बोल्ड सुविधांमुळे टीएन शेषन यांची प्रतिमाही उजळली. कर्तव्यदक्ष आणि कठोर निवडणूक आयुक्त म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.
2005 नंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री
2000 मधील विधानसभा निवडणुकीत फार हिंसा झाली नाही. 2005ची विधानसभा निवडणुकीलाही हिंसेचं गालबोट लागलं. यावर्षी बिहारमध्ये दोनदा मतदान झालं. आधी फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि नंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या मतदानानंतरच नितीश कुमार मुख्यमंत्री बनले ते आजतागायत मुख्यमंत्री आहेत.