भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला, बॅनर फाडले; राजकीय वर्तुळात खळबळ
Madhya pradesh politcs : मध्य प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला झाला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

मध्य प्रदेशच्या दातियातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञातांनी भाजपच्या प्रचार वाहनावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कार्यकर्ते हे चंद्रशेखर आझाद यांच्या सभेतून परतले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या प्रचार वाहनांवर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. आझाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर देखील फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशच्या दातियामधील जिगना पोलीस स्टेशनच्या उदगवा गावात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या प्रचार वाहनाचं पोस्टर देखील फाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दातियामध्ये विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांची विधानसभेची सदस्यता रद्द झाली. फसवणूक प्रकारणात शिक्षा मिळाल्यानंतर त्यांचं पद रद्द झालं. आता या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान 30 जुलै 2026 रोजी होणार आहे. तर मतमोजणी 3 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे.
दातियामध्ये भाजपकडून आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली. नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट कापल्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली. तर काँग्रेसकडून घनश्याम सिंह यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसने या मतदारसंघात भाजपच्या नरोत्तम मिश्रा यांचा पराभव केला होता. भाजपला या जागेवर विजय मिळवायचा आहे. तर भाजपनेही या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
भाजप-काँग्रेस पक्षात जोरदार चुरस
ही पोटनिवडणूक हायप्रोफाइल मानली जात आहे. दोन्ही प्रमुख पक्षाने या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नरोत्तम मिश्रा यांना बाजूला सारून भाजपने मोठा डाव टाकला आहे. काही दिवसांपूर्वी या मतदारसंघात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची देखील रॅली झाली. यंदा काँग्रेससाठी देखील कडवं आव्हान असणार आहे. आता मतदार कोणाला मतदान करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच पोटनिवडणुकीच्या निकालाची अनेकांना प्रतिक्षा असणार आहे.