भाजपच्या बड्या नेत्याच्या ताफ्यावर हल्ला, AAP कार्यकर्त्यांनी कार फोडली, राजकीय वर्तुळात खळबळ
भाजपच्या बड्या नेत्याच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. AAP कार्यकर्त्यांनी भाजप नेत्याची कार फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून पंजाबमधील राजकीय वातावरण तापलं आहे.

भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्य्याच्या बटालाजवळ घासीपूर गावात रवनीत बिट्टू यांचा विरोध करण्यात आला. या विरोधानंतर लोकांनी जोरदार नारेबाजी केली. आंदोलकांनी बिट्टू यांच्या ताफ्यावर अंडी, टोमॅटो, दगडफेक केली. त्यांच्या कारच्या काचा देखील फोडल्या. या दगडफेकीवरून थेट आप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केला आहे.
रवनीनत बिट्टू यांनी सांगितलं की, आम आदमीच्या (AAP) कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अंडी, टोमॅटो फेकण्यात आले. यातील काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मी तातडीने घरात शिरून जीव वाचवल्याचे त्यांनी सांगितले. मी या प्रकरणी पोलिसांना तक्रार दिली आहे. जोपर्यंत आप कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई होत नाही, तोपर्यंत घरी जाणार नाही. आज पठाणकोटमध्ये अंमली पदार्थाच्या विरोधात मोर्चा काढायचा होता. परंतु ‘आप’ पक्षाला पंजाबमधून अंमली पदार्थ नाहीसे व्हावेत, असे वाटत नाही.
भाजप नेत्याच्या कारवर हल्ला
रवनीत सिंह बिट्टू यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर भाजप (BJP) नेते आणि कार्यकर्ते भडकले आहेत. रवनीत बिट्टू यांनी पंजाबची कायदा सुव्यवस्था आणि आम आदमी पक्षावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. आम आदमी पक्षाच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांनी माझ्या ताफ्यावर हल्ला देखील केला. यावेळी घटनास्थळी पंजाब पोलीस देखी होते. काहींनी माझ्या कारच्या काचा फोडल्या. तर अंडी, टोमॅटो देखील फेकले. यात कोणीही दुखापत ग्रस्त झालं नाही. रवनीत बिट्टू यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरून भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा जय इंदर कौर यांनी म्हटलं की, ड्रग्ज विरोधी अभियान रोखण्यासाठी हल्ला झाला. तर भाजप नेते विजय सांपला यांनी पंजाबमध्ये गुंडाराज सुरू असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. या घटनेने पंजाबमधील राजकीय वातावरण तापलं आहे.