Vijay : आता रोज एक हिट फिल्म..; मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांना भाजपचा टोला
टीव्हीकेचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यानंतर भाजपने त्यांना उपरोधिक टोला लगावला आहे. विजय यांच्या अभिनेते असण्यावरून भाजपच्या प्रवक्त्यांनी हा टोला लगावला आहे.

तमिळगा वेत्री कझगमचे (टीव्हीके) अध्यक्ष सी. जोसेफ विजय यांनी आज (रविवारी) तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातील दोन प्रमुख द्रविड पक्ष डीएमके आणि एआयएडीमके यांच्या जवळपास सहा दशकांपासून आलटून पालटून चाललेल्या शासनाचा अंत झाला आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमारास विजय यांनी चेन्नईमधल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत इतर नऊ मंत्र्यांनीही शपथ घेतली, यामध्ये टीव्हीकेच्या काही वरिष्ठ नेत्यांचाही समावेश आहे. विजय हे काँग्रेसला भागीदार बनवून आघाडी सरकारचं नेतृत्व करतील. या शपथविधी सोहळ्यानंतर भाजपने विजय यांना शुभेच्छा देताना उपरोधिक टोलासुद्धा लगावला आहे.
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, “मी तमिळनाडूच्या जनतेला आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या विजय यांना मनापासून शुभेच्छा देतो. विजय यांच्यासमोर आता एक मोठी आणि कठीण जबाबदारी असेल. त्यामुळे हे गरजेचं आहे फिल्मी विश्वाच्या उलट इथे त्यांना दररोज एक ‘हिट’ द्यावा लागणार आहे.”
याआधी अण्णाद्रमुकचे नेते केपी अंबलगन यांनीसुद्धा विजय यांच्या अभिनेते असण्यावरून टीका केली होती. “सरकार स्थापन करण्यासाठी एक ठराविक पात्रात लागते. पण विजयकडे ती बेसिक पात्रताही नाही. तो फक्त एक सिनेमातला अभिनेता आहे. त्याच कारणामुळे AIADMK विजयच्या पक्षाला पाठिंबा देणार नाही. आम्ही विजयचं समर्थन करणार नाही” असं केपी अंबलगन यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे विजय यांनी शनिवारी संध्याकाळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन 120 सदस्यांच्या पाठिंब्याचं पत्र सोपवलं आणि बहुमत सिद्ध केलं.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. परंतु त्यांना स्पष्ट बहुमत मिळवता आलं नाही. त्यामुळे विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआय-एम, विदुथलाई चिरुथैगल कची (व्हीसीके) आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययुएमएल) यांचा पाठिंबा मिळवला आणि आमदारांची संध्या 120 वर नेली. गेल्या दोन दिवसांपासून बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी विजय यांची धावपळ सुरू होती. अखेर आज (रविवारी) त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पांढरा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा कोट.. असा त्यांचा मॉडर्न लूक पहायला मिळाला.