
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने धोका दिल्यामुळे संतापलेल्या एका प्रेयसीने त्याच्या घरी जाऊन गोंधळ घातला. या तरुणीने पेट्रोलची बाटली हातात घेऊन प्रियकराच्या घराचा दरवाजा तोडला आणि आत शिरून संपूर्ण घराला आग लावली. विशेष म्हणजे तिचा प्रियकर त्यावेळी दुसऱ्या प्रेयसीसोबत मंदिरात लग्न करत होता. त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना जबलपूरमधील कुडवारी येथे घडली. विजय सोनी असे प्रियकराचे नाव आहे. तो आपल्या प्रेयसीसोबत लग्न करत असताना, त्याच्या माजी प्रेयसीने त्याचे घर पेटवले. त्यामुळे आता दोन्ही बाजूंनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विजय सोनीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर आधारताल पोलिस ठाण्यात आरोपी मुलीविरुद्ध कलम 332 आणि 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तरुणीने लग्नाच्या नावाखाली फसवणूक आणि शारीरिक शोषण केल्यामुळे विजय सोनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
विजय सोनी आहे डिलिव्हरी बॉय
मिळालेल्या माहितीनुसार विजय सोनी ही झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. विजयची 2 वर्षांपूर्वी तरुणीशी मैत्री झाली होती आणि कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विजयने तिला लग्नाने वचन दिले होते, मात्र कालांतराने विजयने दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिने घराला आग लावली.
विजयच्या कुटुंबाने असा आरोप केला की, मुलगी विजय सोनीला प्रेमाच्या नावाखाली फसवत आहे, तिने यापूर्वी दोनदा लग्न केलेले आहे. मात्र त्या मुलीने म्हटले की, ‘पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मी आणि विजय सोनी गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. लिफ्ट देताना विजय आणि माझी ओळख झाली होती. नंतर हळूहळू मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली आणि जवळीक वाढली. विजयने मला लग्न करण्याचे वचन दिले होते, त्याने गेल्या दोन वर्षांत घरखर्चासाठी पैसेही दिले होते.’
मुलीचे गंभीर आरोप
विजयच्या प्रेयसीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने म्हटले की, विजय माझ्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होता याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी सर्व पुरावे आणि फोटो पोलिसांना दिले आहेत. तर विजयशी लग्न करणारी दुसऱ्या प्रेयसीने म्हटले की, माझे आणि विजयचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विजयने मला लग्न करण्याचे आश्वासन दिले होते, ती खोटं बोलत आहे. ती माझ्या पतीला फसवण्याचा प्रयत्न करत आहे, तिला पैसे हवे आहेत.