ग्लोबल इंडियन ऑफ द इयरने सद्गुरू सन्मानित; कॅनडात पार पडला महासोहळा

सद्गुरू आपल्याला मातीची होणारी झीज, हवामान बदल आणि अन्नाची गुणवत्ता यासारख्या जागतिक आव्हानांबाबतीत व्यावहारिक आणि दीर्घकालीन उपाय देत आहेत. सद्गुरूंसारख्या विचारवंतांकडून कॅनडाला मोठा लाभ होऊ शकतो, कॅनडाचे लक्ष वैयक्तिक कल्याण, शाश्वतता आणि समावेशकता यावर केंद्रित आहे.

ग्लोबल इंडियन ऑफ द इयरने सद्गुरू सन्मानित; कॅनडात पार पडला महासोहळा
Sadhguru
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2025 | 3:43 PM

आध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांना कॅनडा इंडिया फाऊंडेशनने (CIF) ‘Global Indian of the Year’ पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. मानव चेतनेला जागृत करणे आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या ‘Conscious Planet’ अभियानमधील अद्वितीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सद्गुरू यांना पुरस्काराच्या रुपात सन्मान चिन्ह आणि CAD 50,000 (सुमारे 30 लाख रुपये)ची रक्कम देण्यात आली. ही रक्कम त्यांनी कावेरी कॉलिंग या अभियानासाठी समर्पित केली. दक्षिण भारतातील कावेरी नदी पुनर्जिवीत करण्यासाठी कावेरी कॉलिंग ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. नदी पुनर्जिवीत झाल्यास 8.4 कोटी जनतेच्या जीवनात बदल येणार आहे. त्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेला सद्गुरूंनी बळ देण्याचं काम केलं आहे.

 

काय आहे कावेरी कॉलिंग?

कावेरी कॉलिंग हे एक पर्यावरणीय आंदोलन आहे. त्याचा उद्देश…

शेतकऱ्यांना जैविक शेती आणि झाडांवर आधारीत शेती करण्यासाठी प्रेरित करणं आहे.

मृदा आणि जल संरक्षणाला प्रोत्साहन देणं आहे

कावेरी नदीच्या सुखलेल्या जलस्तराला पुन्हा प्रवाहीत करायचं आहे.

सद्गुरू काय म्हणाले?

हा पुरस्कार दिल्याबद्दल सद्गुरूंनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी सर्वांशी संवाद साधला. हा पुरस्कार माझ्यासाठी नाही. तर पर्यावरण वाचवण्यासाठी जे लोक तळमळीने प्रयत्न करत आहेत, अशा लोकांसाठीचा हा पुरस्कार आहे. कावेरी कॉलिंग हे केवळ एक आंदोलन नाही तर ती भावी पिढ्यांची जीवनरेषा आहे, असं सद्गुरू म्हणाले.

मलिक म्हणाले…

यावेळी सीआयएफचे अध्यक्ष रितेश मलिक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सद्गुरू आपल्याला मातीची होणारी झीज, हवामान बदल आणि अन्नाची गुणवत्ता यासारख्या जागतिक आव्हानांबाबतीत व्यावहारिक आणि दीर्घकालीन उपाय देत आहेत. सद्गुरूंसारख्या विचारवंतांकडून कॅनडाला मोठा लाभ होऊ शकतो, कॅनडाचे लक्ष वैयक्तिक कल्याण, शाश्वतता आणि समावेशकता यावर केंद्रित आहे, जे सद्गुरूंच्या मार्गदर्शनासोबत सुसंगत आहे. सद्गुरूंचा योग आणि ध्यान यावरचा भर हा कॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमांशी, विशेषतः मानसिक आजारामुळे व्यवस्थेसमोर निर्माण होणाऱ्या मोठ्या आव्हानाशी संपूर्णपणे जुळणारा आहे, असं मलिक म्हणाले.