मोठी बातमी! आधी पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, आता सर्वपक्षीय बैठक, दिल्लीत घडामोडी वाढल्या

पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. यावेळी भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी याआधी कधीही न घेतलेले निर्णय घेतले आहेत.

मोठी बातमी! आधी पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या, आता सर्वपक्षीय बैठक, दिल्लीत घडामोडी वाढल्या
all party meeting (संग्रहित फोटो)
| Edited By: | Updated on: Apr 23, 2025 | 10:59 PM

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. यावेळी भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी याआधी कधीही न घेतलेले निर्णय घेतले आहेत. भारताने 1960 सालचा ऐतिहासिक असा सिंधू जलवाटप करारा स्थगित केला आहे. या मोठ्या निर्णयासह भारताने इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेतला आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर 24 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये एक सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत सरकार विरोधकांना पहलगाम हल्ल्यानंरच्या भारताच्या भूमिकेची आणि पहलगाममधील सद्यस्थितीची माहिती देणार आहेत.

भारताने सिंधू जलवाटप कराराला स्थिगिती

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची बैठक 23 एप्रिल रोजी पार पडली. या बैठकीला पंतप्रधान, केंद्रीय संरक्षणमंत्री तसेच इतर महत्त्वाचे नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे.

भारताने कोणकोणते निर्णय घेतले?

तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांनाही परत येण्याचे आवाहन केले आहे. सरकारने अटारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला असून या सर्व निर्णयांचा फटका पाकिस्तानला बसणार आहे.

24 एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक

हे सर्व निर्णय घेतल्यानंतर आता पाकिस्तानची काय भूमिका असेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याआधी हे निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने 24 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वच पक्षांना घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती दिली जाईल. पहलगाममध्ये सध्या काय स्थिती आहे? याची माहितीही विरोधी पक्षातील नेत्यांना दिली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच राजनाथ सिंह हे सर्वपक्षीय नेत्यांची चर्चा करत आहेत.

पाकिस्तान काय भूमिका घेणार?

दरम्यान, हे निर्णय घेण्याआधी केंद्र सरकारने पहलगाममधील हल्ल्याचे जशास तसे उत्तर दिले जाईल, असे सांगितले होते. या इशाऱ्यानंतर सरकार काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याच अपेक्षेप्रमाणे आता सिंधू जलवाटप करार स्थगित करण्यासोबतच इतरही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. भारताच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानही आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने भारताच्या या निर्णयांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात आता नेमके काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.