काँग्रेस ज्ञानेश कुमारांच्या विरोधात पुन्हा आक्रमक; दिल्लीत इंडिया आघाडीचे आमदार-खासदार मोर्चा काढणार
काँग्रेस ज्ञानेश कुमारांच्या विरोधात पुन्हा आक्रमक झाली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीचे आमदार-खासदार मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षाचे आमदार दिल्लीत सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा काढणार आहेत. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या भेटीची इच्छा दर्शवली आहे. परंतु सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मतचोरीच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भेटीचा प्रस्ताव नाकारला आहे. मतचोरीच्या आरोपावरील प्रकरणे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिलेश यादव देखील राहुल गांधी यांच्या सुप्रीम कोर्टापर्यंत काढण्यात येणाऱ्या मार्चमध्ये सहभागी होतील. या व्यतिरिक्त आरजेडीचे तेजस्वी यादव, ठाकरे गटाचे संजय राऊत, शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे, सीपीआयचे डी राजा,सीपीएमचे एमए बेबी आणि ममता बॅनर्जी देखील सहभागी होणार आहेत. काँग्रेसच्या मार्चच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी सूचना देखील जारी केल्या आहेत.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटलं की, विरोधकांच्या मार्चमुळे आज सकाळी 6 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत सहा मेट्रो स्टेशन बंद असणार आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने यांनी सांगितलं की, सहा मेट्रो स्टेशनचे एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद राहील. पटेल चौक, जनपथ, राजीव चौक, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटेरिएट आणि बाराखंबा रोड हे मेट्रो स्टेशन बंद राहतील. या मेट्रो स्टेशनवर९ इंटरचेंजची सुविधा उपलब्ध असणार आहेत. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पत्र लिहून आज सायंकाळी 4 ते 5 वाजता भेटीची वेळ मागितली. त्यांना भेट घेऊन मतचोरी रोखणे, ज्ञानेश कुमार राजीनामा, एसआयर रोखणे आणि बॅलेट सिस्टमवर मतदानाची मागणीसाठी भेट घेणार आहेत.
काँग्रेसने भेटीची वेळ मागतिल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सूर्यकांत यांनी म्हटलं की, प्रशासनाच्या पातळीवर कोणतेही आदेश दिले जाऊ शकत नाही. या प्रकरणात काँग्रेस नेत्याला याचिका दाखल करण्यास सांगितलं आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होऊ शकते. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलभूत हक्काचं उल्लंघन होत असल्यास, सुप्रीम कोर्ट हे त्यांच्यासाठी 24 तास खुले आहे. परंतु सुप्रीम कोर्ट हे प्रशासनाच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही’. तर राहुल गांधी म्हणाले होते की, विरोधी पक्ष, तरुण सोमवारी सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढतील. त्यानंतर देशाच्या वतीने सरन्याधीशांना निवेदन देतील. या आंदोलनाला चलो दिल्ली-लोकशाहीसाठी मोर्चा असे नाव दिले आहे. त्यासाठी सर्व नेते हे दीड वाजता कनॉट प्लेस-बारखंबा रोड जंक्शनवर जमा होतील.
