
बिजापूर | 30 जानेवारी 2024 : छत्तीगसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी जवानांवर केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. तर 14 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तात्काळ रामपूरला उपचारासाठी नेण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी कोब्रा एसटीएफ-डीआरजी जवानांवर हल्ला केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर जवानांनी नक्षल्यांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2021मध्ये नक्षलवाद्यांनी याच जागेवर जवानांवर हल्ला केला होता.
सुकमा पोलिसांनी आज टेकूलगुडम येथे जवानांचे कॅम्प सुरू केले होते. या कॅम्पमधील कोब्रा, एसटीएफ आणि डीआरजीचे जवान कँम्पच्या जवळच जोनागुडा- अलीगुडा येथे सर्चिंगसाठी निघाले होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात तीन जवान शहीद झाले. यातील काही जखमी जवानांना सिलगेर कँप येथील प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार करून रायपूरला हलविण्यात आलं. अनेक जवान गंभीर जखमी असल्याने त्यांना हेलिकॉप्टरने रायपूरला नेण्यात आलं आहे. 2021मध्ये नक्षलवाद्यांनी याच परिसरात जवानांवर हल्ला केला होता. त्यात 22 जवान शहीद झाले होते.
दरम्यान, या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर बॅकअपसाठी सीआरपीएफने कोब्रार कमांडो आणि छत्तीसगड डीआरजीचे जवान पाठवले होते. अजूनही या भागात नक्षलवाद्यांची चकमक सुरू आहे. तर, दुसरीकडे जखमींवर उपचार सुरू आहेत. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन या परिसराची घेराबंदीही केली आहे. तसेच सर्च ऑपरेशनही सुरू करण्यात आली आहे. माओवादींच्या फायरिंगला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर नक्षलवादी जंगलात फरार झाल्याचं सांगितलं जात आहे.
2021च्या एप्रिल महिन्यात छत्तीसगडच्या बीजापूर येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता. त्यात 22 जवान शहीद झाले होते. हा हल्ला त्यावेळचा सर्वात मोठा हल्ला मानला जात होता. या हल्ल्यानंतर चौकशी केली असता स्थानिकांनीच नक्षलवाद्यांना मदत केल्याचं समोर आलं होतं. हल्ला करण्यासाठी नक्षलवाद्यांनी एलएमजी म्हणजे लाइट मशीन गन लावली होती. त्याचद्वारे हा हल्ला करण्यात आला होता.