
चीन आणि जपानमधील तणाव वाढतच चालला आहे. काही दिवसांपूर्वीच जपानने चीनवर गंभीर आरोप केले होते. चीनने आमच्या लढाऊ विमानांचे रडार लॉक केल्याचा आरोप जपानने केला होता. मात्र चीनकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री जपानच्या दौर्यावर असताना, जपानचे संरक्षण मंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये बोलताना देखील जपानकडून चीनला मोठा इशारा देण्यात आला होता. जपान तसेच आसपासच्या प्रदेशात शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्यासाठी आम्ही आवश्यक ती कारवाई करू असं जपानने म्हटलं होतं. तैवानच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा संघर्ष आता युद्धापर्यंत येऊन ठेपला आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे जपान आणि चीनमध्ये निर्माण झालेली ही तणावाची परिस्थिती आता धोकादायक वळणावर येऊन ठेपली असून, यामध्ये आता तिसऱ्या देशाची देखील एन्ट्री झाली आहे.
चीन जपान संघर्षात चीनला मदत करण्यासाठी आता रशिया मैदानात उतरला आहे. रशियानं आपले फायटर जेट पाठवले आहेत. जपानच्या संरक्षण मंत्रालयानं केलेल्या दाव्यानुसार अण्वस्त्र वहनाची क्षमता असलेले आणि अणुबॉम्ब हल्ल्यासाठी सक्षम असलेले रशियाचे दोन फायटर जेट TQ-95 तसेच चीनचे बॉम्बर्स विमानांनी जपानच्या सागरातून पूर्व चीनच्या सागराकडे उड्डान केल्याचं जपानने म्हटलं आहे. या चार फायटर जेटने उड्डाण केलं आहे, त्यामुळे जपानने देखील आता या चार लढाऊ विमानावर लक्ष ठेवण्यासाठी आपले फायटर जेट या ठिकाणी तैनात केले आहेत.
जपानकडून असा देखील दावा करण्यात आला आहे की, रशिया आणि चीनच्या केवळ चारच लढाऊ विमानांनी उड्डान केलेलं नाहीये तर ओकिनावा आणि मियाको या दोन बेटांदरम्यान चीनच्या आणखी 16 लढाऊ बॉम्बर्स विमानांनी उड्डान केलं आहे. या दोन्ही बेटादरम्यानचा समुद्र हा आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र मानला जातो. जपानच्या संरक्षण मंत्रालयाकडून आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. दरम्यान रशिया आणि चीनच्या हालचाली वाढल्यानं आता पुन्हा एकदा जगभरातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.