सीजेपीची मोठी घोषणा, आता दिल्लीत आणखी मोठं आंदोलन, चार दिवसांचा प्लान….सरकारच्या अडचणी वाढणार?
दिल्लीत पोलिसांच्या कारवाईदरम्यान सीजेपीने मोठी घोषणा केली. आता दिल्लीत आणखी मोठं आंदोलन करणार असून त्यांनी चार दिवसांचा प्लान आखल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत सीजेपी कार्यकर्त्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपकेसह शेकडो सीजेपी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपकेंनी सीजेपीची कमान अजिंक्य शिंदे यांच्यावर सोपवली. त्यानंतर अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. अभिजीत दिपकेंवर इमोशनल अत्याचार, छळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा केली.
अजिंक्य शिंदे म्हणाले, ‘सीजेपीच्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना विमानातून ताब्यात घेण्यात आलं. यातून दिसून येत आहे की, मोदी सरकार घाबरलं आहे. नेहा बोरा सारखे नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. मागील वेळी जंतरमंतरवर एकत्र येऊन मोदी सरकारला धक्का दिला होता. आता यंदा आंदोलनाची हाक देण्यात आली, यंदा ट्रेन, मेट्रो रोखण्यात आल्या. दिल्लीला येणाऱ्या आंदोलकांना अर्ध्यात रोखण्यात आलं. ट्रेन, बसमधून आंदोलकांना ताब्यात घेतलं. हवा आणि पाणी सोडून सर्वांना रोखलं आहे. परंतु आम्ही त्यांच्या हुकूमशाहीला घाबरणार नाहीत. खरंतर मोदी सरकार घाबरलं आहे. हाच आमच्या आंदोलनाचा अर्धा विजय आहे. सरकारला वाटत असेल, की आंदोलन संपुष्टात येईल. परंतु हे ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील’.
‘अभिजीत दिपकेंच्या आजीचं निधन झालं आहे. त्यानंतरही पोलिसांनी अभिजीत यांच्याशी वकील आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगी दिली नाही. पोलीस इमोशनल अत्याचार करत आहेत. विमानातून त्यांना ताब्यात घेतलं आहे. रस्त्यावर ताब्यात घ्यायला हवं होतं. परंतु विमानातूनच ताब्यात घेत असाल, तर प्रवाशांनी प्रवास करणे सोडून द्यावे का.. त्यांच्यावर हा इमोशन अत्याचार केला जात आहे. तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आलं आहे. आम्ही त्यांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहोत. ही एक दिवसांची लढाई नाही. चार दिवस असो पाच दिवस ही लढाई सुरू राहणार. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला तर सरकार कोसळेल. त्यामुळे सरकार त्यांना वाचवण्यात येत आहे. अघोषित आणीबाणी केल्याने देशाची बदनामी होत आहे. ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे, असे ते पुढे म्हणाले.