NEET पेपर फुटीप्रकरणी CM थलापती विजय संतापले, थेट परीक्षाच बंद करण्याची केंद्राकडे मागणी
NEET Exam : NEET परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले आहे. यावर बोलताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि TVK चे अध्यक्ष थलापती विजय यांनी संताप व्यक्त केला आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या NEET परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि TVK चे अध्यक्ष थलापती विजय यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, ‘पेपर लीक आणि परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली आहेत. NEET लागू झाल्यापासून ग्रामीण भागातील, सरकारी शाळांतील, तमिळ माध्यमातील आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.’
नीट परीक्षा बंद करण्याची मागणी
पुढे बोलताना थलपती विजय यांनी नीट परीक्षा बंद करण्याची मागणी केली आहे. विजय यांनी म्हटले की, ‘सरकारने नीट परीक्षा बंद करावी. तसेच राज्यांना MBBS, BDS आणि AYUSH अभ्यासक्रमांतील सर्व राज्य कोट्यातील जागा बारावीच्या गुणांच्या आधारे भरण्याची मुभा द्यावी. NTA ने यावर्षी 3 मे रोजी देशभरातील 5,432 केंद्रांवर NEET-UG परीक्षा घेतली होती. केवळ तमिळनाडूमधील 31 शहरांमध्ये ही परीक्षा पार पडली. देशभरातून एकूण 22,05,035 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी सुमारे 1.4 लाख विद्यार्थी तमिळनाडूतील होते अशी माहितीही विजय यांनी दिली आहे.
याआधीही पेपरफुटीची घटना
मुख्यमंत्री विजय यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘परीक्षा रद्द झाल्यामुळे देशभरातील लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आशा तुटल्या आहेत.’ दरम्यान, NEET च्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2024 मध्येही पेपर लीकची घटना घडली होती आणि सहा राज्यांत FIR दाखल करण्यात आल्या होत्या. नंतर हा तपास CBI कडे देण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्र सरकारने के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. या समितीने सुधारणांसाठी 95 मुद्द्यांच्या शिफारसी सादर केल्या होत्या. मात्र, या सर्व उपाययोजनांनंतरही दोन वर्षांच्या आत पुन्हा पेपर लीकची घटना घडली आणि परीक्षा रद्द करावी लागली आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असून काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, या परीक्षेत वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांमुळे आता विजय यांनी ही परीक्षाच बंद करण्याची मागणी केली आहे.