
भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिमेत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. त्यानंतर त्याची माहिती भारतीय लष्कराने जगासमोर दिली. भारताने ७ मे रोजी केलेली एअर स्ट्राईक नागरी वस्ती किंवा पाकिस्तानी लष्कराला नुकसान होणार नाही, या पद्धतीने केली होती. भारताच्या एअर स्ट्राईकचा उद्देश दहशतवाद संपवण्याचा होता. भारताच्या या स्पष्टीकरणानंतरही पाकिस्तानने ८ मे रोजी रात्री भारतावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. देशातील १५ शहरांमधील लष्कारी तळावर पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानच्या या कारवाईला उत्तर म्हणून भारताने गुरुवारी पाकिस्तानी शहरांवर ड्रोन हल्ले केले आणि पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचे कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले की, ७ मे रोजी भारताने एअर स्ट्राईकनंतर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी पाकिस्तानी सैन्य ठिकाणांना लक्ष्य केले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पाकिस्तानकडून कोणताही हल्ला झाला तर त्यास ठोस उत्तर दिले जाईल, असे म्हटले होते. त्यानंतरही पाकिस्तानने भारतातील सैन्य ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यात अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, अमृतसर, कपूलथला, आदमपूर, भंटिडा, लुधियाना, नाल, फोलेदी, भुज या लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्लाचा प्रयत्न केला. परंतु भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली हा हल्ला निष्क्रिय केला. पाकिस्तानकडून झालेल्या या हल्ल्याचे अवशेष भारताने जमा केले आहेत.
भारताने गुरुवारी पाकिस्तानमधील शहरांवर केलेला ड्रोन हल्ला हा पाकिस्तानच्या कारवाईला प्रत्युत्तर असल्याचे कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. तसेच पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रीय करण्यात आली. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार वाढला आहे. सातत्याने गोळीबार करुन तोफगोळे टाकले जात आहे. यामध्ये भारताचे १६ नागरिक ठार झाले. भारताकडून या हल्ल्यास चोख उत्तर दिले जात आहे, असे कर्नल कुरैशी यांनी सांगितले.