नरेंद्र मोदींनी घेतले या बड्या नेत्याचे आशीर्वाद, भेटीत महत्त्वाची खलबतं, नेमकं कारण काय?
सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या खास क्षणाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही भेट घेतली आहे. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे.

सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या खास क्षणाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीचे काही छायाचित्रं देखील आता समोर आले आहेत. या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी यांना एक पुष्पगुच्छ देखील भेट दिला आहे. या भेटीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 7 ऑक्टोबर 2001 मध्ये पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते, त्यानंतर ते सलग 12.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते 2014 मध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले त्यानंतर आतापर्यंत सलग ते देशाचे पंतप्रधान आहेत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असे सलग 25 वर्ष ते सरकारचे प्रमुख आहेत. मोदी यांच्या राजकीय वाटचालीमध्ये लालकृष्ण आडवाणी याचं मोठं योगदान राहिलं आहे.
आडवाणी यांचा समावेश हा भाजपच्या काही मोजक्या प्रमुख नेत्यांमध्ये होतो. भाजपच्या वाढीमध्ये देखील त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यामुळे या खास क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली आहे. मोदी यांचा सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल भाजपमधील अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रप्रथम या भावनेतून जनतेची सेवा आणि सुशासन याला प्राथमिकता दिली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील पंतप्रधान मोदीचं अभिनंदन केलं आहे. राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या कामांचं कौतुक केलं आहे.
या भेटीनंतर मोदी यांनी आडवाणी यांच्यासोबतचा एक फोटो देखील ट्विटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं की आडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी अनेक वर्ष जनसेवेतून आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.