दोन राज्यांच्या निवडणुका रद्द करा, काँग्रेसची मागणी, अभिषेक मनु सिंघवी यांचा गंभीर आरोप काय?
काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक प्रक्रिया हायजॅक केली असून सहकाऱ्यांनाही अंधारात ठेवले. काँग्रेसने दिल्ली आणि हरियाणातील निवडणुका रद्द करण्याची मागणी केली आहे.

निवडणूक आयोगाबाबत इंडियन एक्सप्रेसने केलेल्या गौप्यस्फोटावरून वादळ उठलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य अभिषेक मनु सिंघवी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप करतानाच दिल्ली आणि हरियाणातील विधानसभेच्या झालेल्या निवडणुका रद्द करा, अशी मागणी सिंघवी यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशाची दिशाभूल केली आहे. आज निवडणूक आयोगासारखी संवैधानिक संस्था सुद्धा स्वतंत्र नाहीये. निवडणूक आयोगात अनेक निर्णय होतात. पण मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या सहकाऱ्यांनाच अंधारात ठेवतात, असा हल्लाही सिंघवी यांनी चढवला आहे.
ज्येष्ठ काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणूक आयोग अंतरिक बुलडोझर असल्याचा आरोपही सिंघवी यांनी केला. ज्ञानेश कुमार यांनी केवळ देशाची दिशाभूल केली नाही तर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगालाच हायजॅक केलं आहे. निवडणूक आयोग ही एक बहुमताची संस्था आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोग डमी असून एक व्यक्तीच आयोग चालवत आहे का? असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी फॉर्म 6 बदलून नियमांचं उल्लंघन केलं आहे, असा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे.
यंत्रणा केंद्रीकृत केली
दरम्यान, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि खासदार कपिल सिब्बल यांनीही पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांवर जोरदार हल्ला चढवला आहे. बहुमत ज्ञानेश कुमार यांच्या बाजूने नाही हे आज सिद्ध झाले आहे. दोन्ही निवडणूक आयुक्तांनी आक्षेप नोंदवणे सुरूच ठेवलं होतं. पण ज्ञानेश कुमार यांनी कायद्याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण यंत्रणा केंद्रीकृत केली आहे. दोन सदस्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. 30 राज्यांमध्ये आतापर्यंत 13 कोटी नावे हटवण्यात आली आहेत आणि या प्रक्रियेअंतर्गत आणखी 30 कोटी नावे हटवली जाऊ शकतात. निवडणूक आयुक्त जोशी आणि संधू या दोघांनीही फॉर्म 6 मध्ये आजी-आजोबा आणि आई-वडिलांच्या अनिवार्य मतदार नोंदणीला विरोध केला होता, असं सिब्बल म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने दखल घ्यावी
एक व्यक्ती संपूर्ण देशाची दिशाभूल करत होता. एक व्यक्ती लोकशाहीशी खेळत होता आणि सर्वोच्च न्यायालय त्याच एका व्यक्तीवर विसंबून होते. ज्ञानेश कुमार यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. मागील सर्व निवडणुका रद्द केल्या पाहिजेत. बिहार आणि बंगालमधील निवडणुकांसह सर्व निवडणुका रद्द केल्या पाहिजेत. ज्या व्यक्तीच्या आदेशानुसार ज्ञानेश कुमार यांनी हे गुन्हे केले, त्या व्यक्तीला जबाबदार धरले पाहिजे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. जर सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली नाही, तर राजकीय पक्षांनी शांततेने रस्त्यावर उतरावे, असे मी आवाहन करतो, असंही सिब्बल म्हणाले.