Sunita Ahuja : आता घर रिकामं वाटतंय…सुनीता अहुजानं व्यक्त केलं दुःख, गोविंदाबद्दल काय म्हणाली?
Sunita Ahuja : दिवाळीपूर्वी, सुनीता अहुजानं जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत आपलं दुःख व्यक्त केलंय.

बॉलिवूडचा ‘हिरो नं. १’ गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दरम्यान, दिवाळीपूर्वी सुनीता अहुजानं भावनिक प्रतिक्रिया दिल्या. जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना, तिनं सांगितलं की, आता दिवाळीच्या दिवशी तिचं घर रिकामं वाटते आणि ती हा सण एकटीच साजरा करते.
पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत, सुनीता अहुजानं दिवाळीच्या जुन्या आठवणी सांगितल्या आणि सांगितलं की, काळाच्या ओघात तिचं कुटुंब खूप बदललं आहे. पूर्वी तिचं घर नातेवाईक आणि मुलांनी भरलेलं असायचं, पण आता सर्वजण मोठे झाले आहेत आणि आपापल्या आयुष्यात व्यग्र आहेत. दिवाळीच्या दिवशी घरातील नेहमीचा उत्साह आणि लगबग तिला आठवते.
सुनीता म्हणाली की, ‘पूर्वी जेव्हा दिवाळी साजरी व्हायची, तेव्हा माझं घर गजबजलेलं असायचं. माझी सासू, भाचे आणि मुलं असायची. खूप लगबग असायची, पण आता मुलं मोठी झाली आहेत आणि सासूबाई गेल्या आहेत. त्यामुळे घर रिकामं वाटतं. मी मुलांना घरी थांबायला सांगू शकत नाही. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यग्र आहे आणि तुम्ही कोणालाही त्रास देऊ शकत नाही. आता मी माझा आनंद स्वतःच निर्माण करते. मी घरी दिवे लावते आणि मिठाई खाते. मला डायबिटीज आहे, त्यामुळे मी जपून खाते, पण मी माझ्या दिवाळीचा आनंद घेते.’
सुनीता गंमतीनं म्हणाली, ‘माझ्या सासूनं मला खूप छान साडी आणि सोन्याच्या वस्तू भेट दिल्या. मग मी ते फक्त त्यांच्याकडूनच नाही, तर गोविंदाकडूनही घेतल्या. आता गोविंदा थोडा कंजूस झाला आहे. लग्न तर झालं, नाही का? आता आपण दिलं पाहिजे. आपण आपल्या घरातील लक्ष्मीला दिलं तर जास्त लक्ष्मी येईल. म्हणून, आपण आपल्या घरातील लक्ष्मीला दिलं पाहिजे.’
दरम्यान, गोविंदा आणि सुनीता अहुजा यांनी ११ मे १९८७ रोजी गुपचूप लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर जवळपास दोन वर्षांनी, १६ जुलै १९८९ रोजी त्यांची मुलगी टीना अहुजा हिचा जन्म झाला. टीनाच्या जन्मानंतर गोविंदानं त्याच्या आणि सुनिताच्या लग्नाची गोष्ट जगासमोर उघड केली. त्यानंतर, १ मार्च १९९७ रोजी या जोडप्याचा मुलगा, यशवर्धन अहुजाचा जन्म झाला.
