Greater Noida : भाडेकरूनं घर रिकामं करण्यास नकार दिल्यानं वृद्ध दाम्पत्यावर घराबाहेरच्या पायऱ्यांवर राहण्याची वेळ

| Updated on: Jul 26, 2022 | 3:19 PM

गेल्या वर्षी जुलैमध्ये आम्ही फ्लॅट भाड्याने दिला होता. आम्ही स्पष्ट केले होते, की 11 महिन्यांनंतर तो रिकामा करणे आवश्यक आहे. संबंधित भाडेकरू तिच्या पतीपासून विभक्त होऊन तिच्या मुलासोबत राहते, असे फ्लॅटच्या मालकाने सांगितले आहे.

Greater Noida : भाडेकरूनं घर रिकामं करण्यास नकार दिल्यानं वृद्ध दाम्पत्यावर घराबाहेरच्या पायऱ्यांवर राहण्याची वेळ
भाडेकरूनं घर रिकामं करण्यास नकार दिल्यानं स्वत:च्याच घराबाहेर पायऱ्यांवर राहत असलेलं दाम्पत्य, सोबत नातेवाईक
Image Credit source: Times
Follow us on

ग्रेटर नोएडा : भाडेकराराची मुदत संपल्यानंतरही भाडेकरू घर रिकामे करण्यास तयार नसल्याने वृद्ध दाम्पत्याला चार रात्री पायऱ्यांवर घालवाव्या लागल्या आहेत. ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथे हा प्रकार घडला आहे. ग्रेटर नोएडामधील एका गृहनिर्माण संस्थेत फ्लॅटचे मालक असलेल्या एका वृद्ध जोडप्याला त्यांच्या घराच्या सामानासह चार रात्री घराबाहेरच्या पायऱ्यांवर काढाव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे भाडे कराराची मुदत (Agreement) एक महिन्यापूर्वी संपली आहे. सुनील कुमार आणि राखी गुप्ता यांच्या मालकीचा हा प्लॅट आहे. 19 जुलै रोजी सुनील कुमार (61) आणि राखी गुप्ता मुंबईहून नोएडातील सेक्टर 16 बी मधील श्री राधा स्काय गार्डन सोसायटीमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये सेवानिवृत्तीनंतरचे जीवन व्यतीत करण्याच्या आशेने आले. सुनील कुमार मार्चमध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधून निवृत्त झाले. नोएडा एक्स्टेंशनला पोहोचल्यानंतर, त्यांचा भाडेकरू (Tenant), एक 35 वर्षीय महिला, फ्लॅट रिकामा करेल या आशेने ते दोन दिवस एका नातेवाईकाकडे राहिले.

पतीपासून विभक्त

सुनील कुमार यांनी सांगितले, की गेल्या वर्षी जुलैमध्ये आम्ही फ्लॅट भाड्याने दिला होता. आम्ही स्पष्ट केले होते, की 11 महिन्यांनंतर तो रिकामा करणे आवश्यक आहे. संबंधित भाडेकरू तिच्या पतीपासून विभक्त होऊन तिच्या मुलासोबत राहते. कुमार यांनी 19 एप्रिल रोजी संबंधित भाडेकरू महिलेला एक मेसेज पाठवला आणि तिला आठवण करून दिली की भाडेकरार 10 जून रोजी संपणार आहे. तिने ठीक आहे असे उत्तर दिले. 20 जूननंतर तिने आमचे कॉल घेणे किंवा मेसेजेसना प्रतिसाद देणे बंद केले. काही दिवसांनी तिने परत म्हटले, की तिचे मूल आजारी आहे, असे कुमार यांनी सांगितले.

अपमानित करत निघून जाण्यास सांगितले

22 जून रोजी राखी यांची बहीण ममता वार्ष्णेय फ्लॅटमध्ये गेल्या. त्यांच्यासोबत आणखी एक महिला होती. जेव्हा त्यांना फ्लॅट रिकामा करण्यास ममता यांनी सांगितले, त्यावेळी संबंधित महिलेने त्यांचा अपमान केला आणि निघून जाण्यास सांगितले, असे ममता वार्ष्णेय म्हणाल्या. वृद्ध दाम्पत्यही त्यांच्या 15व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये गेले, परंतु भाडेकरूने घर सोडण्यास नकार दिला.

हे सुद्धा वाचा

भाडेकरू महिला एक प्रॉपर्टी डिलर

आम्ही पोलिसांशी संपर्क साधला, पण काही उपयोग झाला नाही. आम्ही जिल्हा दंडाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी सांगितले, की ते आमचे पत्र पोलीस आयुक्तांना पाठवतील, असे कुमार म्हणाले. मध्य नोएडाचे डीसीपी हरीश चंदर म्हणाले, की न्यायालयाचा आदेश असल्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत. दुसरीकडे, स्वत: एक प्रॉपर्टी डीलर असलेल्या महिला भाडेकरूने सांगितले, की तिला भाड्याने फ्लॅट मिळणे कठीण जात आहे. 2017मध्ये पुण्याहून स्थलांतरित झालेल्या महिलेने सोसायटीतील काही रहिवाशांवर तिच्याबद्दल अफवा पसरवल्याचाही आरोप केला.