
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ला नेमका कसा झाला? याचा शोध भारतीय तपास संस्था शोध घेत आहेत. हा शोध घेताना तपास अधिकाऱ्यांना मोठी आणि धक्कादायक माहिती हाती लागली आहे. याच तपासाचे धागे यूट्यूबर ज्योती मल्होत्रापर्यंत पोहोचले आहेत. असे असतानाच आता पहलगाम हल्ल्याच्या मूळाशी जाताना तपास संस्थांच्या कचाट्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान आला आहे. याच जवानाबाबत आता मोठे धक्कादायक खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे त्याचं पहलगाम कनेक्शनही समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानसाठी आरोप करण्यात आलेला हा सीआरपीएफचा जवान पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हल्ल्याच्या काही दिवस आधी तो पहलगाममध्ये तैनात होता. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला. त्याच्या सहा दिवसांआधी त्याची पहलगामवरून बदली झाली होती. पकडण्यात आलेल्या या जवानाचे नाव मोतीराम जाट असे असून तो असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत होता.
मोतीराम जाट हा सीआरपीएफच्या 116 व्या बटालीयनमध्ये तैनात होता. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएच्या म्हणण्यानुसार हा जवान पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना भारताविषयीची संवेदनशील माहिती पुरवत होता. 2023 सालापासूनच पैशांच्या बदल्यात त्याचं देशाशी गद्दारी करण्याचं काम चालू होतं, असा दावा करण्यात आलाय. भारतीय सुरक्षा दलांच्या मोहिमांची माहिती, सुरक्षा दलांची रणनीती तसेच सैन्याच्या खास ठिकाणांची माहिती त्याने पाकिस्तानला पुरवल्याचाही आरोप आहे.
एनआयएने ताब्यात घेतल्यानंतर या जवानाला निलंबित करण्यात आलं आहे. त्याची सध्या कसून चौकशी केली जात आहे. त्याने आतापर्यंत पाकिस्तानला कोण-कोणती माहिती पुरवलेली आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
सीआरपीएफच्या सांगण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय संस्था त्याच्या सोशल मीडियावर पाळत ठेवून होत्या. त्यानंतर त्याला आता ताब्यात घेण्यात आलं आहे. आता त्याला एनआयएकडे सोपवले जाणार आहे. 21 मेपासून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. त्याला 6 जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीय.