अखेर अकवान चक्रीवादळ धडकलं, समुद्र खवळला, पुढचे 3 तास धोक्याचे? या राज्यांना तडाखा
अकवान चक्रीवादळ अखेर उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले आहे. ताशी 90 किलोमीटर वेगाने वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि समुद्रात उंच लाटा उसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किनारपट्टी भागांत पुराचा धोका असून, हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुढील तीन तास परिस्थिती गंभीर राहणार आहे.

अखेर अकवान चक्रीवादळ धडकलं आहे. आज सकाळी सकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर गोपाळपूरजवळ धडकले आहे. किनारपट्टी ओलांडताना वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर असून, वाऱ्याचे झोत ताशी 90 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. चक्रीवादळाची किनारपट्टीवर धडकण्याची (landfall) प्रक्रिया पुढील 3 तास सुरू राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केलं आहे.
अकवान चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रभावित भागातील प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाने केल्या आहेत. अकवान चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची प्रक्रिया पुढील तीन तास चालणार आहे. या वादळाचं केंद्र गोपालपूर येथे आहे. चक्रीवादळामुळे ओडिशा आणि आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात समुद्रात 0.5 मीटर उंच लाटा उसळणार आहेत. त्यामुळे आंध्रप्रदेशच्या विजयनगरम आणि श्रीकाकुलम तसेच ओडिशाच्या गंजाम आणि पुरी जिल्ह्यात खालच्या भागात पाणी भरण्याचा धोका आहे. तसेच 24 तासात ओडिशा, आंध्रची किनारपट्टी, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही परिसरात अचानक पूर येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हजारो लोकांचं स्थलांतर
दक्षिण विभागाचे महसूल विभागीय आयुक्त विजय अमृता कुलांगे यांनी एएनआयला याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. काही लोकांचं सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आलं आहे. कुणाचीही आरोग्याची समस्या उद्भवल्यास त्याला तात्काळ उपचार देण्यात येणार आहेत. गजपतीमध्ये 22 हजाराहून अधिक आणि कंधमाळमध्ये 13 हजाराहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. कोणत्याही व्यक्तीचा किंवा प्राण्याचा मृत्यू होऊ नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आम्ही प्लानिंग करून विविध टीम तैनात केल्या आहेत. डोंगराळ भाग, घसरणीचे क्षेत्र आणि भुस्खलन होणाऱ्या परिसरांकडे आमचं विशेष लक्ष आहे. आम्ही या सर्व परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेलं आहे. आम्ही वाहतुकीवरही लक्ष ठेवून आहोत, असं विजय कुलांगे यांनी सांगितलं.
समुद्रात उंचच उंच लाटा
दरम्यान, अकवान चक्रीवादळामुळे विशाखापट्टनम येथील समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मच्छिमारांसह इतरांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच पर्यटकांना या भागात फिरकण्यास बंदी घालण्यात आली आहे.