बापाच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ मागवला… आईच्या मयतालाही आल्या नाही ! अखेर वृद्धाश्रमाचं मोठं पाऊल; तिन्ही मुलींना…

हरियाणातील सोनीपतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलींसाठी आयुष्यभर झटलेले शिवचरण गुप्ता वृद्धाश्रमात दाखल झाले. पत्नीच्या निधनानंतर त्यांचाही आश्रमातच मृत्यू झाला. मुलींना शिक्षिका व बँक कर्मचारी बनवूनही, त्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला येऊ शकल्या नाहीत. व्हिडिओ कॉलवर अखेरचा निरोप घ्यावा लागला, ज्यामुळे बदलत्या कौटुंबिक नात्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बापाच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ मागवला... आईच्या मयतालाही आल्या नाही ! अखेर वृद्धाश्रमाचं मोठं पाऊल; तिन्ही मुलींना...
बापाच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ मागणाऱ्या मुलींबाबत आश्रमाने घेतला मोठा निर्णय
| Updated on: Aug 08, 2026 | 1:39 PM

आयुष्यभर मुलांसाठी झटणाऱ्या आई-वडिलांना शेवटच्या क्षणी मुलांची साथ मिळावी, एवढीच अपेक्षा असते. मात्र, हरियाणातील सोनीपत येथील एका घटनेने बदलत्या कौटुंबिक नात्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हरियाणातील सोनीपत येथून नात्यांमधील बदलती परिस्थिती दाखवणारी एक अत्यंत भावूक घटना समोर आली आहे. एकेकाळी कापडाचे मोठे व्यापारी असलेले शिवचरण रामरतन गुप्ता यांनी आपल्या तीनही मुलींना शिकवले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आली.व्यवसायात मोठे नुकसान झाल्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे अखेर त्यांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागला. ज्या तीन मुलींशी ते दिवसातून दोन-तीन वेळा व्हिडिओ कॉलवर बोलायचे, वडिलांच्या निधनानंतर त्याच मुली अंतिम दर्शनासाठी प्रत्यक्षात मात्र पोहोचू शकल्या नाहीत. अखेर वडिलांचा अंत्यसंस्कार आश्रम व्यवस्थापनाने केला आणि मुलींनी व्हिडिओ कॉलवरूनच त्यांना अखेरचा निरोप दिला. त्यासाठी मुलींनी पैसेही पाठवले होते , मात्र नंतर आश्रमाने मोठा निर्णय घेत ते पैसे परत पाठवले.

पत्नीचाही आश्रमातच झाला मृत्यू

शिवचरण मूळचे महाराष्ट्रातील होते. सोनीपतच्या ककरोई गावात त्यांचे काही नातेवाईक राहत होते. वर्ष 2024 मध्ये ते सोनीपत येथील ‘आपना घर’ आश्रमात दाखल झाले. कापडाच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी आश्रम व्यवस्थापनाला सांगितले होते.

काही दिवसांनी ते पत्नी मीना गुप्ता यांनाही आश्रमात घेऊन आले. दोघेही पती-पत्नी तेथे एकत्र राहू लागले. 12 ऑक्टोबर 2024 रोजी मीना गुप्ता यांचे आश्रमातच निधन झाले. आश्रमाने त्यांच्या तीनही मुलींना आईच्या निधनाची माहिती दिली. मात्र, अंत्यसंस्कारासाठी एकही मुलगी आली नाही. यानंतर शिवचरण यांनी आश्रमातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पत्नीवर अंत्यसंस्कार केले. एवढेच नाही तर नंतर हरिद्वारला जाऊन त्यांनी पत्नीच्या अस्थींचे विसर्जनही केले.

मुलींवर जीवापाड प्रेम करणारे वडील

आश्रमाच्या संचालिका सारिका कालरा यांच्या म्हणण्यानुसार, शिवचरण आपल्या तीनही मुलींवर खूप प्रेम करत होते. एक मुलगी नेपाळमध्ये, एक सूरतमध्ये तर एक उत्तर प्रदेशात राहत होती. दोन मुली शिक्षिका होत्या, तर एक एचडीएफसी बँकेत नोकरी करत होती.

शिवचरण दिवसातून दोन-तीन वेळा मुलींशी व्हिडिओ कॉलवर बोलत असत. त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, याची त्यांना सतत काळजी असायची. कुटुंब पुन्हा एकत्र यावे, अशी त्यांची मनापासून इच्छा होती. व्यवसायात झालेल्या नुकसानीनंतरही त्यांची स्वप्ने मात्र संपली नव्हती. त्यांना पुन्हा एकदा कापडाचे दुकान सुरू करायचे होते. आश्रमात ते अनेकदा सांगत असत की, थोडी मदत मिळाली तर ते पुन्हा छोटासा व्यवसाय उभा करतील.

एक मुलगी वडिलांना भेटायलाही आली होती

आश्रमाच्या माहितीनुसार, मोठी मुलगी नीता अग्रवाल यांचा वडिलांशी वेळोवेळी संपर्क होता. वडिलांना औषधे, कपडे किंवा इतर काही गरज असल्यास त्या मदत करत असत. गेल्या वर्षी, 2025 साली त्या आश्रमातही आल्या होत्या आणि काही काळ वडिलांसोबत राहिल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा परत गेल्या.

शिवचरण यांनी 12 मार्च 2026 रोजी आश्रम सोडला. दिल्लीमध्ये काही पैसे घेणे आणि काही मालमत्तेचे व्यवहार पूर्ण करायचे असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर सोनीपतला परत येऊन पुन्हा छोटासा कापडाचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, नंतर ते दुसऱ्या एका आश्रमात राहत असल्याची माहिती आश्रम व्यवस्थापनाला मिळाली. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, पण बोलणे होऊ शकले नाही.

वडील आजारी असल्याची माहिती 20 दिवस आधीच दिली होती

दरम्यान, शिवचरण यांची प्रकृती खालावू लागली. आश्रम व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आजाराची माहिती तीनही मुलींना सुमारे 20 दिवस आधीच देण्यात आली होती. निधनाच्या चार दिवस आधीही मुलींना वडील आजारी असून त्यांना भेटू इच्छित असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तरीही एकही मुलगी वडिलांना भेटण्यासाठी पोहोचली नाही. मंगळवारी रात्री उशिरा शिवचरण रामरतन गुप्ता यांचे निधन झाले. निधनाची माहिती मिळाल्यानंतर आश्रमाने पुन्हा एकदा मुलींशी संपर्क साधला आणि अंत्यसंस्कारासाठी येण्याचे आवाहन केले. मात्र, अंतर आणि वेळेचे कारण देत त्यांनी येणे शक्य नसल्याचे सांगितले.

5100 रुपये पाठवले, पण अंत्यसंस्कारासाठी आल्या नाहीत

नेपाळमध्ये शिक्षिका असलेल्या मोठ्या मुली अनीता यांनी ऑनलाइन 5100 रुपये पाठवले. वडिलांचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याची विनंती त्यांनी केली. तीनही मुलींनी व्हिडिओ कॉलद्वारे वडिलांना अखेरचा निरोप दिला. त्यानंतर त्यांनी अंत्यसंस्काराचा व्हिडिओही मागितला. अस्थी विसर्जनाबाबतही त्यांनी आश्रम व्यवस्थापनाशी चर्चा केली. दूर असल्यामुळे अस्थी विसर्जनाची जबाबदारीही आश्रमानेच घ्यावी, अशी विनंती मुलींनी केली. मात्र, आश्रम व्यवस्थापनाने मुलींनी पाठवलेले 5,100 रुपये परत केले

आयुष्यात पहिल्यांदाच अंत्यसंस्कार व्हिडिओ कॉलवर दाखवावे लागले

आश्रमाशी संबंधित एका समाजसेवकाने सांगितले की, एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवण्याची वेळ त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आली. ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी एक महत्त्वाची बाबही अधोरेखित केली—या प्रकरणाची संपूर्ण सत्यता समजून घेतल्याशिवाय मुलींना दोष देणे योग्य ठरणार नाही. मुलींच्या बाजूने या प्रकरणावर अद्याप कोणतीही सविस्तर सार्वजनिक प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us