
राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. अशातच आता या बॉम्बस्फोटचं इंटरनॅशनल कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. या बॉम्बस्फोटांचा संबंध आता तुर्कीशी असल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. डॉ. मोहम्मद उमर आणि डॉ. मुझम्मिल शकील यांच्या पासपोर्टमध्ये ते तुर्कीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कीत हे दोघे नेमके कुणाला भेटले याचा सखोल तपास सुरु आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणा आता या दोघांच्या तुर्की भेटीची माहिती शोधत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार उमर आणि मुझम्मिल यांनी अनेक टेलिग्राम गृपमध्ये जोडलेले होते. गृपमध्ये सामील झाल्यानंतर काही दिवसांनी हे दोघे तुर्कीला गेले होते. यावेळी तुर्की आणि अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातील हँडलर उमर आणि फरिदाबाद मॉड्यूलच्या इतर सदस्यांच्या सतत संपर्कात होते. उमर आणि इतरांना भारतात डॉक्टर मॉड्यूल पसरवण्याची सूचना करण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तपास अधिकाऱ्यांना दोन टेलिग्राम गृप सापडले आहेत, याच गृपद्वारे डॉक्टर मॉड्यूल तयार करण्यात आले होते. यातील एक गृप पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेटिव्ह उमर बिन खट्टाब चालवत असल्याचेही समोर आले आहे. आता तपास अधिकारी उमर आणि मुझम्मिल हे जैश-ए-मोहम्मदच्या हँडलरला कुठे भेटले असतील याचा तपास करत आहेत. मात्र अधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुझम्मिलने जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसराची अनेकदा रेकी केली होती. पोलिसांनी त्याच्या मोबाइल डेटाच्या तपासणीतून ही माहिती मिळवली आहे. पोलीसांनी याबाबत बोलताना म्हटले की, 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना असावी, मात्र त्यावेळी परिसरात मोठा बंदोबस्त असतो, त्यामुळे हा प्लॅन फसला असल्याची शक्यता आहे. या भागाची रेकी करताना मुझम्मिल कोणत्या वेळी जास्त गर्दी असते याची माहिती गोळा करत होता असंही समोर आलं आहे.