
विद्यार्थीनींशी लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात अडकलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी याचा अटकपूर्व जामीन दिल्लीच्या कोर्टाने फेटाळला आहे. श्री शारदा संस्थान ट्रस्ट आणि शृंगेरी मठाने स्वामी चैतन्यानंद बाबावर आर्थिक अनियमितता आणि संपत्तीचा दुरुपयोग प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणात हा जामीन फेटाळण्यात आला आहे. कोर्टाने म्हटले की स्वामी चैतन्यानंद बाबावर इतके गंभीर आरोप असल्याने त्याला अटकपूर्व जामीन देण्याचे औचित्य होत नाही.
श्रृंगेरी पीठाने या बाबा चैतन्यानंद याच्यावर बनावटगिरी आणि तोतयागिरी, फसवणूक करणे तसेच गुन्हेगारी विश्वासघात असे गंभीर आरोप लावले आहेत . आरोपीने संस्था आणि त्याच्याशी संबंधित संपत्ती आणि पैशाचा खाजगी लाभासाठी दुरुपयोग केल्याचाही आरोप पीठाने लावले आहेत. आरोपीने श्रृंगेरी पीठासंबंधीत २० कोटी रुपयांची संपत्ती आणि उत्पन्न गहाळ केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची सुरुवात एका ऑडीटमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचे उघडकीस आल्यानंतर डिसेंबर २०२४ रोजी झाली होती. तपासात असे कळले की साल २०१० मध्ये बाबाने श्री शारदा इंस्टीट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट रिसर्च फाऊंडेशन ट्रस्ट नावाने नवा ट्रस्ट स्थापन केला. मात्र आधीच एक एआयसीटीईद्वारा मान्यता प्राप्त ट्र्स्ट अस्तित्वात होता. या नव्या ट्रस्टद्वारे सर्व कमाई आणि महसुल वळता केल्याचा उलगडा झाला आहे.
कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की प्रकरणाची गंभीरता आणि गुन्ह्याचे स्वरुप पहाता आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करणे योग्य होणार नाही.न्यायालयाने हे मान्य केले की बाबा विरोधातील आरोप केवळ आर्थिक फसवणूक नसून संस्थेशी जुळलेल्या हितधारकांचा विश्वासघाताशीही संबंधित आहेत. या आधारावर या जामीन याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांना कारवाई करत बाबाशी संबंधित १८ बँक खाती आणि २८ एफडींना गोठवले आहे. या खात्यात सुमारे ८ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम बाबा उर्फ पार्थ सारथी याने बनवलेल्या ट्र्स्टद्वारे धोक्याने तयार केली असून पीठाची संपत्ती हडपण्याचा हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हा चैतन्यानंद बाबा मॅनेजमेंट इंस्टीट्यूट संस्थेच्या आर्थिक कमजोर वर्गातील विद्यार्थींनीना अश्लिल मॅसेज पाठवून त्यांचे लैंगिक शोषण करायचा आणि या संस्थेतील महिला वॉर्डनही त्यास मदत करायच्या असे उघडकीस आले आहे. या प्रकरणात माजी विद्यार्थ्यांनी याआधीही तक्रार केली होती. परंतू त्याची दाद कोणी घेतली नाही. साल २०१६ मध्ये डिफेन्स कॉलनी पोलिस ठाण्यातही बाबा विरोधात केस दाखल झाली होती. परंतू पैशाच्या जोरावर बाबा वाचला होता.