अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला पुन्हा विरोध, थेट न्यायालयात याचिका; काय होणार निर्णय?
कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांच्या दिल्लीतील कनॉट प्लेस येथील 'तिरंगा' आंदोलनाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दिल्ली उच्च न्यायालय यावर आज निकाल देणार असून, आंदोलन होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्या 16 ऑक्टोबर रोजी हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला अटकाव करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या आंदोलन होणार की नाही याचा फैसला थोड्याच वेळात दिल्ली न्यायालयात होणार असून कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोर्ट आंदोलनाला मनाई करणार की काही अटी शर्ती घालून आंदोलन करण्यास सांगणार याकडेही देशाचं लक्ष लागलं आहे.
दिल्लीत उद्या सीजेपीचं आंदोलन होणार असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्या होणारं आंदोलन थांबवा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्यावर दुपारी हे प्रकरण पाहू, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कॅनॉट प्लेस आंदोलनाची जागा नाही
‘कॅनॉट प्लेस हे आंदोलनाच ठिकाण नाही’ असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी याचिकेत उपस्थित केला आहे. ‘यावेळी हे कॅनॉट प्लेसच्या अगदी मध्यभागी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आंदोलक सीपी बंद करणार आहेत’, असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. अभिजीत दीपके यांनी उद्या सायंकाळी सीपीमध्ये तिरंगा आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली असून कोर्ट त्यावर आता काय निर्णय देते हे पाहावं लागेल.
दीपकेंचं आवाहन काय?
कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी उद्या 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता दिल्लीच्या कॅनॉट प्लेसच्या सीपी म्हणजे सेंट्रल पार्कमध्ये ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची घोषणा केली आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांना केवळ तिरंगा फडकवला म्हणून तुरुंगात टाकण्यात आलं आहे. त्यामुळे देशभक्तांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी सेंट्रल पार्कात हातात तिरंगा घेऊन या. तिथेच आपण तिरंगा फडकवू. तिरंगा फडकवणं हा काही गुन्हा नाहीये. ज्या लोकांना दिल्लीला यायला जमणार नाही. त्यांनी आपल्या शहरांमध्ये तिरंगा मार्च सुरू करावा, असं आवाहन दीपके यांनी केलं आहे.
तिरंगा आमचा स्वाभिमान आहे. तिरंगा फडकावणं हा आमचा अधिकार आहे. तो काही गुन्हा नाहीये. हे या हुकूमशाहाला दाखवून द्यायचं आहे. कदाचित उद्या मला पुन्हा तुरुंगात टाकतील. पण मला त्याची पर्वा नाही. आम्ही तिरंगा फडकवणारच आहोत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, जंतरमंतरवर तिरंगा फडकवला म्हणून सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या दोघांना पाच दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांनाही तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. जंतरमंतरवर अनधिकृतपणे घुसखोरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.