धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच दिल्लीसह महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी; 2 तासात काय काय घडलं? ग्राऊंड रिपोर्ट काय?

नीट परीक्षेतील पेपरफुटीमुळे संतप्त झालेल्या तरुणांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. जनरेट्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या बातमीने जंतरमंतरवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही वेगवान घडामोडी घडल्या, ज्यामुळे या दोन तासांतील घटनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच दिल्लीसह महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी; 2 तासात काय काय घडलं? ग्राऊंड रिपोर्ट काय?
dharmendra pradhan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 25, 2026 | 5:43 PM

अखेर तरुणांच्या आंदोलनाला यश मिळालं. अभिजीत दीपके आणि सोनम वांगचुक यांच्या चिकाटीला यश मिळालं. काँग्रेससह विरोधी पक्षाने तरुणांना दिलेल्या साथीला यश मिळालं. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर निराशेच्या गर्तेत गेलेल्या तरुणांनी आत्महत्या केली. या तरुणांना आज न्याय मिळाला. जनमानसाच्या रेट्यामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे घोषणा आणि आक्रोशाने तडपणारं जंतरमंतर आज जल्लोषाने उसळलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येताच दिवाळी साजरी झाली. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच्या दोन तासात काय काय घडलं? याचाच घेतलेला हा आढावा.

जंतरमंतरवर दिवाळी…

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी येऊन धडकताच तरुणांनी जोरदार जल्लोष केला. टाळ्या वाजवून, शिट्या वाजवून आणि मोठ मोठ्या घोषणा देत तरुणांनी जल्लोषाला वाट मोकळी करून दिली. हजारो तरुण एकसाथ उभे राहून जल्लोष करत होते. नाचत होते. एकमेकांना अलिंगन देत होते. मिठाई वाटप करत होते. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहीए… सुबह हो गई मामू… अशा घोषणा तरुण देत होते.

अभिजीत दीपकेंना पहिला फोन

अभिजीत दीपके जंतरमंतरवर होते. आंदोलनाची रणनीती ठरवत असतानाच त्यांचा फोन खणखणला. समोरून आवाज आला. धर्मंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. फक्त चार शब्द कानावर पडले अन् अभिजीत दीपकेंनी एकच जल्लोष केला. दीपकेंनी ही बातमी सहकाऱ्यांना सांगितली. माईकवरून अनाऊन्समेंट झाली अन् तरुणांनी एकच जल्लोष करण्यास सुरवात केली. अभिजीत दीपकेंनी मूठ वळवून उंचावली. तरुणांना अभिवादन केलं. आपल्या एकजुटीचा विजय झाल्याचं सांगत सर्वांनीच एकत्रितपणे जल्लोष केला.

कँडल मार्च काढा

त्यानंतर अभिजीत दीपके यांनी तरुणांना संबोधित केलं. हा आपला सर्वांचा विजय आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांना आज न्याय मिळाला. आपण सरकारला झुकवलं, असं अभिजीत दीपके म्हणाले. तसेच आज संध्याकाळी तुम्ही ज्या शहरात असाल तिथे कँडल मार्च काढा, असं आवाहन दीपके यांनी केलं.

फडणवीस यांना फोन

दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रातही घडामोडींना वेग आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून फोन आला. तातडीने बोलावण्यात आलं. मुख्यमंत्री नागपूरला होते. तिथूनच मुख्यमंत्री दिल्लीला जायला रवाना झाले.

शिंदेही दिल्लीकडे?

फडणवीस यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनाही दिल्लीचं बोलावणं आलं आहे. शिंदे सध्या ठाण्यात आहे. संध्याकाळी ते दिल्लीला जायला निघणार आहेत. शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत, अशी बातमी येऊन धडकली. मात्र ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट झालं. शिंदे दिल्लीला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us