सियाच्या भावाला तिचे चेतनशी असलेले प्रेमसंबंध माहिती होते का ? मग तो शांत का राहिला, जबानीत काय पुढे आले ?

दोन सुखवस्तू कुटुंबात एका कॉमन नात्याच्या मदतीने लग्नाचे संबंध ठरतात. दोन्ही कुटुंबे उद्योजक असल्याने लग्नासाठी राजस्थानचे पंचतारांकित हॉटेल बुक होते. प्री वेडिंगसाठी बालीचे एअर तिकीट बुक होते. मात्र, साखरपुड्यानंतर वागदत्त वधूच होणाऱ्या पतीला लोहगड कड्यावरुन ढकलते..हे प्रकरण साधेसुधे नाही...

सियाच्या भावाला तिचे चेतनशी असलेले प्रेमसंबंध माहिती होते का ? मग तो शांत का राहिला, जबानीत काय पुढे आले ?
Ketan Agarwal murder
| Updated on: Jun 30, 2026 | 11:45 PM

पुण्याच्या सुखवस्तू कुटुंबातील केतन अग्रवाल याची त्याची वागदत्त वधू सिया गोयल हिने प्रियकर चेतनच्या मदतीने हत्या केली. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी केतनला लोहगडावर नेऊन अवघ्या २० वर्षांच्या सिया हीने अत्यंत थंड डोक्याने चेतनला ३०० फूटांच्या कड्यावरुन ढकलून संपवल्याचे प्रकरण देशात गाजत आहे. या प्रकरणाला तिसरा एक कांगोरा आहे. तो म्हणजे सिया हीचा भाऊ साहिल गोयल, त्याची या प्रकरणात आज पोलिसांनी जबानी नोंदविली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना ३ जुलैपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

केतन अगरवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन यांच्याविरोधात तपास सुरू असतानाच आता सियाचा भाऊ साहिल गोयलच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. तपास यंत्रणांनी अद्याप काही सिया हीचा भाऊ साहिल गोयल याला आरोपी ठरवलेले नाही. मात्र त्याच्या चौकशीत त्याला नेमक्या कोणत्या गोष्टी माहिती होत्या आणि त्याने पोलिसांना नेमके काय सांगितले ? याकडे आता लक्ष लागले आहे. साहिलच्या जबाबातून आणि तपासातून या प्रकरणातील काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साहिल गोयल याने पोलिसांना दिलेल्या जबाबात क्रिकेट खेळताना त्याची चेतन चौधरी याच्याशी मैत्री झाल्याचे सांगितले आहे. त्यानंतर साहिलसोबत क्रिकेट सामना पाहायला गेलेल्या सिया हीची चेतन याच्याशी ओळख झाली आणि पुढे त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाल्याचे म्हटले जाते. म्हणूनच पहिला प्रश्न उपस्थित होतो की सिया आणि चेतनच्या प्रेमसंबंधांची माहिती साहिल याला आधीपासून होती का?

फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाला. मात्र सियाला हे लग्न करायचं नसल्याचं तिने भाऊ साहिल याला सांगितल्याची माहिती तपासात समोर आली आहे.त्यामुळे दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की सियाला केतनशी लग्न नको होतं, हे साहिल याला माहीत असताना त्याला सियाचे चेतनसोबतचे संबंधही माहीत होते का?असा सवाल निर्माण झाला आहे.

बाली येथे केतन सोबत प्री-वेडिंग शूटसाठी जाताना घरातून निघताना सिया हिने येण्यास नकार दिला होता. मग साहिलने तिला जबरदस्तीने गाडीत बसवल्याचे म्हटले जाते. त्यामुळे दोघा बहिणभावात भांडण ही झाले होते. हे कार चालकाने पोलिसांकडे स्पष्ट केले आहे. त्यानंतर फूड मॉलमध्ये केतनचा पासपोर्ट सिया हीने फाडल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर केतनच्या पासपोर्ट अभावी हा दौरा रद्द करावा लागून विमानतळावरुन माघारी परतावे लागले होते.

तिसरा प्रश्न

त्यामुळे एक तिसरा प्रश्न निर्माण होतो की केतनचा पासपोर्ट गायब झाल्यानंतर साहिल याला बहिण सिया हिच्यावर संशय आला होता का? जर संशय आला असेल, तर तो संशय साहिल याने त्याचवेळी उपस्थित का केला नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातूनच स्पष्ट होणार आहेत. सध्या उपलब्ध माहितीनुसार साहिल गोयल हा आरोपी नसून त्याचा केवळ जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र आता उपस्थित झालेल्या प्रश्नानंतर पोलीस चौकशीतून तपास कोणत्या दिशेला जातो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Follow Us