Divya Mittal : IAS पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर पुढे काय? अखेर दिव्या मित्तल यांनी या प्रश्नाचं दिलं उत्तर
Divya Mittal : दिव्या मित्तल यांनी काही दिवसांपूर्वी तडकाफडकी IAS पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्या काय करणार अशी चर्चा होती. खासगी कारणांमुळे राजीनामा दिला अशी सुद्धा दबक्या आवाजात चर्चा होती. पण आता दिव्या मित्तल यांनीच पुढे काय करणार ते स्पष्ट केलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून IAS अधिकारी दिव्या मित्तल यांच्या राजीनाम्याची भरपूर चर्चा आहे. दिव्या मित्तल पुढे काय करणार? या बद्दल विविध तर्क-वितर्क सुरु होते. आता प्रशासकीय सेवा सोडल्यानंतर दिव्या मित्तल काय करणार ते चित्र स्पष्ट झालं आहे. दिव्या मित्तल यांनी IAS चा राजीनामा दिल्यानंतर त्या आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. पण त्या कुठल्या राजकीय पक्षात सहभागी होणार नाहीत. त्यांना सर्वसामान्य लोकांसोबत मिळून राजकीय मंच स्थापन करायचा आहे. त्या माध्यमातून त्यांना जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडायची आहे, त्यांचं निराकारण करायचं आहे.
काही दिवसांपूर्वी IAS चा राजीनामा दिल्यानंतर माझ्यासमोर अनेक प्रश्न होते, असं दिव्या मित्तल म्हणाल्या. लोकांना हे जाणून घ्यायचं होतं की, मी पुढे काय करणार, कोणासोबत जाणार, कुठून सुरुवात करणार. या सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला काही वेळ लागला. कारण त्या स्वत: या नव्या मार्गावरुन चालण्याची तयारी करत होत्या. 13 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर दिव्या मित्तल यांनी 30 ऑगस्ट 2026 रोजी IAS पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी या निर्णयामागे खासगी आणि कौटुंबिक कारणं असल्याचं म्हटलं होतं. अधिकृतपणे 15 सप्टेंबरपासून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला.
दिव्या मित्तल काय म्हणाल्या?
“उत्तर प्रदेश माझ्यासाठी फक्त कर्मभूमि नाहीय. इथल्या लोकांनी मला कुटुंबाचा भाग मानलं. एक अधिकारी म्हणून मी उत्तर प्रदेशमध्ये आलेले. पण इथल्या जनतेने मुलगी म्हणून मला स्वीकारलं. म्हणून दिव्या मित्तल त्यांच्या राजकारणाची सुरुवात उत्तरप्रदेश मधूनच करणार आहेत” असं दिव्या मित्तल यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशचा इतिहास आणि सामाजिक बदलांचा दाखल देत या भूमीने अनेकदा देशाला दिशा देण्याचं काम केलय असं म्हटलं. कुठल्या एका व्यक्तीला मसीहा मानून थांबू नका, बदलाची सुरुवात लोकांना स्वत:ला करावी लागेल असं दिव्या मित्तल म्हणाल्या.
मला त्या लोकांचा आवाज बनायचं आहे
कुठलं पद मिळवण्यासाठी मी राजकारणात येत नाहीय. मला त्या लोकांचा आवाज बनायचं आहे, ज्यांचं म्हणणं सरकारी कार्यालयापर्यंत पोहोचत नाही किंवा म्हणणं पोहोचलं तरी ऐकलं जात नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली, तरीही अजून पायाभूत समस्यांचे प्रश्न कायम आहेत. त्यांना या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. त्याचा संदर्भ देत प्रशासकीय कार्यकाळातील अनेक अनुभवांचा दिव्या मित्तल यांनी दाखला दिला.