Shreyas Iyer : कॅप्टन बनताच श्रेयस अय्यरचा निर्णय चुकला, त्याला टीममध्ये घेतलं आणि पहिली वनडे हरला
रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर यांसारखे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. गोलंदाजीतही कुलदीप यादव महागडा ठरला. नेमकं काय घडलं सामन्यात?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज चौथा वनडे सामना खेळवला गेला. पण या सामन्यामध्ये भारताचा दारुण पराभव झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर अन् इशान किशन यांसारख्या तगड्या आणि दिग्गज खेळाडूंचा किवी प्लेअर्ससमोर निभाव लागला नाही. विशेष म्हणजे या सगळ्यांना 10 धावाही करता आल्या नाहीत. कहर म्हणजे विराट आणि श्रेयस हे तर चक्क शुन्यावर आऊट झाले. त्यामुळे संघाचे पार तीनतेरा वाजले.
आजचा टीम इंडियाचा खेळ अतिशय निराशाजक होता. त्यामुळे संघाचे चाहते नाराज झाले आहेत पण त्याचवेळी या सामन्यामध्ये कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर जबाबदारी पार पाडत होता. त्यामुळे नेमकं काय चुकलं आणि कसा झाला टीम इंडियाचा एवढा मोठा दारुण पराभव, याचं विश्लेषण सुरु आहे. त्यापैकीच एक मोठी बाब समोर आली आहे. ती म्हणजे प्लेइंग 11 मधील खेळाडू. होय, आजच्या सामन्यामध्ये कुलदीप यादव हा अतिशय महागडा खेळाडू ठरला.
कुलदीप यादवने या सामन्यामध्ये 8 ओव्हर टाकल्या. त्यामध्ये त्याने तब्बल 73 धावा दिल्यात. यावेळी त्याने एकही विकेट काढलेली नाही. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगने 10 ओव्हरमध्ये 55 धावा दिल्या. त्याला एक विकेट मिळाली. अकिब नबीने 8 मध्ये 59 धावा दिल्या. त्याला दोन विकेट मिळाल्या त्याशिवाय गुरनूर ब्रार यानेही 69 धावा दिल्या. त्यालाही दोन विकेट मिळाल्या. पण सर्वात महाग पडला कुलदीप यादव.
त्यामुळे भारताच्या गोलंदाजांंकडून इतक्या धावा दिल्या गेल्याने न्यूझीलंडने 333 धावांचं मोठं आव्हान टीम इंडियाला दिलं. पण त्याच्या प्रत्त्युत्तरामध्ये टीम इंडियाला 100 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यामुळे टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. पण असं असलं तरी कर्णधार अय्यरने कोणत्याही गोलंदाजावर पराभवाचं खापरं फोडलेलं नाही. त्याने सामन्यानंतर बोलताना सांगितलं की, आज खेळपट्टीच नीट नव्हती. आधी वाटलं खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. पण नंतर दुसऱ्या डावामध्ये वेगळंच घडलं. झालेला पराभवं पाहणे हे अतिशय कठीण आहे. पण आम्ही पुढील सामन्यासाठी सकारात्मक मानसिकतेने खेळायला उतरु असं अय्यर म्हणाला.
