Viral Video: कालपर्यंत कुणी विचारत नव्हतं, आता येऊ लागली लग्नासाठी स्थळ; एका AI फोटोने गावात खळबळ, तरुणाचा जुगाड काय?
उत्तरप्रदेशमधील एका तरुणाने एआय वापरुन असा काही फोटो तयार केला की त्याची अख्ख्या गावात एकच चर्चा रंगली. एवढंच नव्हेतर त्याच्याकडे ढुंकूनही न पाहणारे गाववाले आमच्या पोरीशी लग्न करा म्हणत त्याच्या पाठीमागे लागले.

Viral Video: सध्या एआयचा जमाना आहे. एआयमुळे आपल्या कल्पनेतील प्रत्येक गोष्ट फोटोंच्या रुपात दाखवता येते. एआयचा वापर जितका चांगल्या गोष्टींसाठी होतो तितकाच तो स्कॅम, लोकांना लुबाडण्यासाठीही केला जातो. मात्र, उत्तरप्रदेशमधील एका तरुणाने एआय वापरुन असा काही फोटो तयार केला की त्याची अख्ख्या गावात एकच चर्चा रंगली. एवढंच नव्हेतर त्याच्याकडे ढुंकूनही न पाहणारे गाववाले आमच्या पोरीशी लग्न करा म्हणत त्याच्या पाठीमागे लागले. नेमकं काय आहे हे प्रकरण? तरुणाने नेमकं असं केलं तरी काय? जाणून घ्या!
एका AI फोटोची कमाल, तरुणाला येऊ लागली लग्नाची स्थळ!
ही मजेशीर घटना तरुण पंडित नावाच्या एका मुलाची आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुण या व्हिडिओमध्ये आपली संपूर्ण स्टोरी सांगतो. या मुलाने सांगितलं की, त्याने एआयचा वापर करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत स्वतःचा एक अतिशय भारी फोटो तयार केला. यानंतर, तरुण हा फोटो थेट ग्रामपंचायतीकडे घेऊन गेला.
तिथे उपस्थित असलेल्या वडीलधाऱ्या मंडळींना त्याने स्वतःचा आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवताच, संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. गावकरी चर्चा करु लागले अन् गावात त्याचे वजनही चांगलेच वाढले. तरुणाने सांगितलं की गावात कोणीही विचारत नव्हतं मात्र आता त्याला श्रीमंत घरची स्थळे येऊ लागलीत, माझ्या मुलीशी लग्न करं म्हणून अनेकजण लोटांगण घालत नाहीत.
इतकेच नाही, तर गावकऱ्यांनी त्याला पुढच्या निवडणुकीत गावप्रमुख पदासाठी निवडणूक लढवण्याचे आमंत्रणही दिले आहे. तरुण म्हणतो की, एआय खूप उपयुक्त आहे, फक्त त्याचा योग्य वापर कसा करायचा हे माहित असणे आवश्यक आहे. आता त्याची पुढची योजना याहूनही मोठी आहे. तरुण हसत म्हणाला की, पुढच्या वर्षी तो पंतप्रधान मोदींसोबत स्वतःचा फोटो काढून थेट गावप्रमुख पदाची निवडणूक लढवेल.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया!
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी या तरुणाच्या कल्पकतेला दाद दिली आहे, तर काही जणांनी गावातील लोक इतके भोळे कसे? असा सवालही उपस्थित केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, गावकऱ्यांना जर सत्य समजले तर ते तुला तेल लावलेल्या बांबुने झोडपून काढतील, असा इशाराही काही नेटकऱ्यांनी दिला आहे.
