
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केलं आहे. भारतासह अनेक देशांवर त्यांनी प्रचंड प्रमाणात टॅरिफ लादला आहे, त्याचा फटका हा जागतिक बाजाराला बसत असल्याचं दिसून येत आहे, दरम्यान ट्रम्प हे एका मागून एक मोठे आणि जगाला धक्के देणारे निर्णय घेत आहेत. त्यांनी टॅरिफनंतर एच 1 बी व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर ज्यांनी आपला व्हिसा रिन्यू करण्यासाठी अर्ज केला, त्यांच्या अपॉइंटमेंट काही काळासाठी रद्द केल्या, एवढंच नाही तर ज्यांना अमेरिकेचा व्हिसा पाहिजे असेल त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटची कडक तपासणी करण्यात येणार आहे, त्यानंतरच त्यांना व्हिसा देण्यात येणार आहे, जर सोशल मीडिया अकाऊंटवर अमेरिकेच्या विरोधात काही वादग्रस्त वक्तव्य आढळून आलं तर अशा लोकांना व्हिसा न देण्याचा निर्णय अमेरिकेनं काही दिवसांपूर्वी घेतला होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या दुतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना देखील धमकी देण्यात आली होती. अमेरिकेत क्राइम ठरेल अशी कोणतीही कृत करू नका, जर तुम्हाला अटक झाली तर तुमचा व्हिसा कायम रद्द होऊ शकतो. तुम्हाला पुन्हा व्हिसा मिळणार नाही, तुम्हाला भारतात परतावं लागेल, तुमच्यासाठी अमेरिकेचे दरवाजे कायमचे बंद होतील, असं भारतातल्या अमेरिकन दुतावासानं म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसाबद्दल आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
अमेरिकन सरकारने आता मोठं पाउल उचललं असून, रशिया इराणसह तब्बल 75 देशातील नागरिकांची व्हिसा प्रक्रिया अस्थायी काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत फॉक्स न्यूजकडून माहिती देण्यात आली आहे. हा नवा नियम 21 जानेवारीपासून लागू होणार आहे. या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, संबंधित देशांमधील अमेरिकेच्या दूतावासांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत की, या यादीमधल्या कोणत्याही देशातील नागरिकांना व्हिसा देण्यात येऊ नये.
कोण कोणत्या देशांचा समावेश?
रिपोर्टनुसार या देशांमध्ये सोमालिया, रशिया, इराण, अफगाणिस्तान, ब्राझील, नायजेरिया, थायलंड, मिस्त्र, यमन या देशांसह 75 देशांचा समावेश आहे, आता या देशाील नागरिकांना अमेरिकेत अस्थायी कालावधीसाठी प्रवेश बंद असणार आहे.