
पश्चिम बंगाल पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. आणखी एका एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला आहे. दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाजवळ या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. संपूर्ण देशात या घटनेची चर्चा रंगली आहे. अशातच आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या घटनेवर बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर (कॉलेजला) जाऊ देऊ नये. त्यांनी स्वतःचे रक्षणही केले पाहिजे. हा जंगलाचा परिसर आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही. जो कोणी दोषी आढळेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल.’ मात्र आता या विधानामुळे गोंधळ उडाला आहे.
विरोधी पक्षांनी ममता यांच्या महिलांबाबतच्या या पक्षपातीपणावर आणि प्रशासनाच्या अपशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बॅनर्जी यांनी पुढे बोलताना असेही म्हटले की, या प्रकरणात सरकारला ओढणे चुकीचे आहे, कारण मुलीची सुरक्षा सुनिश्चित करणे ही खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी आहे.’ मात्र बॅनर्जी यांनी आरोपींना सोडणार नाही असं आश्वासनही दिले आहे.
बलात्काराच्या या घटनेनंतर पोलीसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी स्थानिक रहिवासी आहेत. त्यांची ओळख अपू बौरी (21), फिरदौस शेख (23), शेख रियाझुद्दीन (31) आणि शेख सोफिकूल अशी पटली आहे. आता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दुर्गापूरमधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. पीडित मुलगी ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी आहे. ती मित्रासह जेवायला बाहेर गेली होती, त्याचवेळी आणखी दोन-तीन पुरूष आले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेवेळी पीडितेचा मित्र तिला तिथेच सोडून पळून गेला.