
कोणत्याही अडथळ्यांशिवाय अखेर सुनीता विल्यम्सचं पृथ्वीवर आगमन झालं आहे. तब्बल नऊ महिन्यानंतर सुनीता पृथ्वीवर आलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीताचं स्वागत केलं आहे. मोदींनी एक ट्विट करून तिला वेलकम बॅक म्हटलं आहे. भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स एका छोट्या मिशनवर अंतराळात गेली होती. पण तांत्रिक बिघाडामुळे हे मिशन लांबलं. ते इतकं की सुनीताला अंतराळात नऊ महिने म्हणजे 286 दिवस राहावं लागलं आहे. मोदींनी ट्विट करून या अंतराळवीरांच्या सहास आणि धैर्याचं कौतुक केलं आहे.
तुमचं स्वागत आहे. #Crew9! पृथ्वीने तुम्हाला मिस केलं होतं. ही साहस, हिंमत आणि असीम मानवीय भावनांची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि #Crew9च्या अंतराळवीरांनी पुन्हा एकदा दृढतेचा वास्तविक अर्थ काय असतो हे आपल्याला दाखवून दिलं आहे. विशाल अज्ञाताच्या समोरचा अतुट संकल्प नेहमीच लाखो लोकांना प्रेरणा देईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सुनीता आणि तिचा क्रू मेंबर बुच विल्मोरने गेल्या वर्षी 5 जून रोजी बोइंगच्या स्टारलाइनर क्रू कॅप्सूलमधून उड्डान केलं होतं. हे मिशन केवळ एक आठवडा चालणार होतं. पण स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे मिशन वाढलं. नासाला चालकाविहिन अंतराळ यान परत आणावं लागलं. त्यानंतर स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनचा वापर करून सुनीताच्या परतीची व्यवस्था करावी लागली. कॅप्सूलमधील काही समस्यांमुळे तिचं आगमनही थोडं लेट झालं. त्यामुळेच सुनीताला परत येण्यासाठी मार्च महिना उजाडला.
Welcome back, #Crew9! The Earth missed you.
Theirs has been a test of grit, courage and the boundless human spirit. Sunita Williams and the #Crew9 astronauts have once again shown us what perseverance truly means. Their unwavering determination in the face of the vast unknown… pic.twitter.com/FkgagekJ7C
— Narendra Modi (@narendramodi) March 19, 2025
जोपर्यंत सुनीता आणि विल्मोर खाली उतरले तोपर्यंत पृथ्वीच्या चारही बाजूने 4,576 वर्तुळे पूर्ण केली होती. एकूण 121 मिलियन मैल म्हणजे 195 मिलियन किमीचा हा प्रवास होता. सुनीता ला ट्रेलब्लेझर आणि एक आयकॉन असं मोदींनी संबोधलं आहे. तसेच अंतराळ विश्वातील तिच्या योगदानाचंही मोदींनी कौतुक केलं आहे.
अंतरिक्ष अन्वेषण हे मानवी क्षमतांच्या सीमांना पुढे नेणे, स्वप्न पाहण्याचे धाडस करणे आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याचे धाडस ठेवण्याबद्दल आहे. सुनीता विलियम्स, एक ट्रेलब्लेझर आणि एक आयकॉनने तिच्या संपूर्ण करिअरमध्ये या भावनेचे उदाहरण घालून दिलं आहे, असं सांगतानाच त्यांनी चालक दलाच्या सुरक्षित परत येण्याची खात्री करणाऱ्या टीमच्या अथक प्रयत्नांचे देखील कौतुक केले आहे.
ज्यांनी सुनीता विल्यम्सला सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्याबद्दलचाही आम्हाला नितांत अभिमान आहे. त्यांनी दाखवून दिलं की जेव्हा अचूकता आणि उत्कटतेला एकत्र केलं जातं आणि तंत्रज्ञान कटीबद्धतेसह वापरलं जातं, तेव्हा काय होऊ शकतं, असं मोदी म्हणाले. तर, अंतराळातून परत आल्यानंतर आता सुनीता विल्यम्स भारतात येण्याची योजना आखत असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.