
नवी दिल्लीः बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात आयकर विभागाने धाड टाकल्यापासून आता आयकरचे अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. त्यामुळे गेल्या काही तासांपासून दोन्ही ठिकाणी आयकर पथककडून सर्वेक्षण सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. आयटी विभागाच्या या कारवाईवर आता एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाकडूनही टीका करण्यात आली आहे.
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाकडून एक निवेदन जारी करण्यात आली आहे. त्यांच्या या माहितीनुसार बीबीसी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन तपासादरम्यान जप्त करण्यात आले आहेत.
तर लेखा कार्यालयात ठेवलेल्या संगणकाच्या डेटाची छाननी केली जात आहे. या कारवाईबरोबरच कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यालाही बाहेर पडू दिलं जात नाही.
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, बीबीसी इंडियाच्या कार्यालयातील आयकर धाडीबद्दल ते अत्यंत चिंतेत आणि गंभीर आहेत. बीबीसी कार्यालयाच्या नवी दिल्ली आणि मुंबईतील आयकर विभागाच्या टीमकडून ही तपासणी केली जात आहे.
त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, नुकताच बीबीसीने 2002 च्या गुजरात दंगली आणि भारतातील अल्पसंख्याकांच्या सद्यस्थितीवर 2 माहितीपट प्रदर्शित करण्यात आले होते.
त्यानंतर बीबीसीच्या या माहितीपटावर गुजरात आणि केंद्र सरकारने चुकीचे आणि पक्षपातीपणाचा आरोप त्या माहितीपटावर करण्यात आला होता. त्याचमुळे या बीबीसीच्या या माहितीपटावर भारतात बंदी घालण्यात आली.
बीबीसीच्या संपादकांनी या कारवाईमध्ये म्हटले आहे की, सरकारच्या धोरणांवर आणि सत्ताधारी पक्षावर टीका करणाऱ्या पत्रकार आणि पत्ररांच्या संघटनांना धमकावण्यासाठी त्यांना त्रास देण्यासाठी सरकारी संस्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
आयटी सर्वेक्षण हाही त्याचाच एक भाग असल्याचेही सांगण्यात आले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये देखील, Newsclick आणि Newslaundry च्या कार्यालयात असेच एक आयकर विभागाकडून तपासणी करण्यात आली होती.
जून 2021 मध्ये, दैनिक भास्कर आणि भारत समाचार यांच्या विरोधातही तपासणी करण्यात आली होती. तर फेब्रुवारी 2021 मध्ये आयकरने न्यूजक्लिकच्या कार्यालयावरही छापा टाकला होता.
सरकारी संस्थांचा अशा प्रकारे वापर केला जात असल्यामुळे लोकशाही धोक्यात येत असल्याचेही निवेदनामध्ये म्हटले आहे. पत्रकारिता आणि माध्यम संस्थांचे अधिकार या कारवाईमध्ये दबले जाऊ नयेत, म्हणून अशा तपासामध्ये सावधगिरीबरोबरच संवेदनशीलत राखणे महत्वाचे आहे असे मतही व्यक्त केले जात आहे.
गिल्डने देखील आपल्या पूर्वीच्या मागणीचा पुनरुच्चार करत म्हटले आहे की, असे तपास नियमांनुसार आणि स्वतंत्रपणे केले जावे.
स्वतंत्रपणे तपास केला तरच त्यातून माध्यमांना दडपण्याचा किंवा धमकावण्याचा प्रकार होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यामुळे या कारवाईनंतर बीबीसीने एक निवेदन जाहीर केले आहे की, आयकर अधिकारी सध्या नवी दिल्ली आणि मुंबईधील बीबीसी कार्यालयामध्ये आहेत. त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य करणार असून ही परिस्थिती लवकरच सोडवली जाईल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.
दिल्लीतील बीबीसी कार्यालयात आयकर विभागाच्या 24 कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे. त्यांचे एकूण चार संघ आहेत, त्यापैकी एका टीमध्ये आयकरच्या 6 कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे.
तर या कारवाईनंतर बीबीसीने आपल्या कर्मचार्यांना एक संदेश दिला आहे, त्यामध्ये असे म्हटले आहे की जे कर्मचारी घरी आहेत त्यांनी घरीच थांबावे. घरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये जाण्याच्या भानगडीत पडू नये.
बीबीसी सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून, आम्ही ती परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळत आहोत. त्यामुळे बीबीसीच्या कर्मचाऱ्यांनी काळजी करण्याची कोणतीही गरज नाही.
तर दिल्लीत ज्या प्रमाणे कारवाईचे धाडसत्र सुरु आहे. त्याचवेळी जवळपास 10 ते 12 जणांची टीमही मुंबईत आहे. मुंबईतील बीकेसी परिसरात असलेल्या विंडसर बिल्डिंगमध्ये आज सकाळी 11 वाजता प्राप्तिकर पथकाचे आगमन झाले होते.