
सध्या दिवाळीची सगळीकडे धूम आहे. या सणानिमित्त घरोघरी गोड-धोड पदार्थ बनवले जातात. शेजारी, नातेवाईकांना गोड पदार्थ भेट म्हणून दिले जाते. याच उत्सवात आजकाल कंपन्यादेखील सहभागी होत आहेत. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वस्तू भेट म्हणून देतात. काही कंपन्या मिठाईचे वाटप करतात. दरम्यान, सध्या एका कंपनीने दिवाळीची भेट म्हणून सोनपापडीचे बॉक्स दिल्याने कर्मचाऱ्यांनी हेच बॉक्स थेट कंपनीच्या गेटवर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
सध्या समोर आलेला प्रकार नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र कर्मचाऱ्यांनी रागात सोनपापडीचे बॉक्स कंपनीच्या गेटवर फेकून दिले आहेत. अनेक कंपन्या दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देतात. हे बोनस कधी-कधी कर्मचाऱ्यांच्या पगाराएवढेच असते. एका कंपनीने मात्र कर्मचाऱ्यांना बोनस तर दिलेच नाही. परंतु या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनसऐवजी सोनपापडीचे बॉक्स वाटले. याचाच राग कर्मचाऱ्यांना आला.
या कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीने भेट म्हणून दिलेले हे सोनपापडीचे बॉक्स नंतर गेटसमोर फेकून दिले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी तर हे बॉक्स गेटच्या मध्ये टाकले आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एक फ़ैक्ट्री ने इस बार दिवाली पर वर्करों को बोनस की जगह सोहनपपड़ी का डिब्बा दे दिया। विरोधस्वरूप -वर्करों ने सारे डिब्बे फ़ैक्ट्री के गेट पर ही छोड़ दिए। pic.twitter.com/sKKggeoT28
— 𝙼𝚛 𝚃𝚢𝚊𝚐𝚒 (@mktyaggi) October 21, 2025
हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही नेटकरी अन्नाचा अपमान करू नये, असे म्हणत कर्मचाऱ्यांचे कृत्य चुकीचे आहे, अशा भावना व्यक्त केल्या आहेत. तर काही लोकांनी नो गिफ्ट पॉलिसिअंतर्गत आमची कंपनी तर आम्हाला काहीच देत नाही. त्यामुळे सोनपापडीचे बॉक्स मिळणे हीदेखील काही लहान बाब नाही, असे काही नेटकरी म्हणाले आहेत. काही नेटकऱ्यांनी मात्र या कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते. सणासुदीच्या काळात अशा प्रकारची भेट देऊन कर्मचाऱ्यांची हेटाळणी करण्यात आली आहे, असे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. एक्स या समाजमाध्यमावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.