पाकिस्तानला वाचवण्यासाठी आता ‘बिग ब्रदर’ची एन्ट्री; पाकमध्ये नेमकं काय घडतंय?

भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरील दबाव प्रचंड वाढला आहे, पाकिस्तानच्या राजकारणात देखील मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानला वाचवण्यासाठी आता बिग ब्रदरची एन्ट्री; पाकमध्ये नेमकं काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 09, 2025 | 6:43 PM

पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, भारतानं या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ आड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. त्यानंतर पाकिस्तानकडून देखील भारतावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला आहे, पाकिस्तानचे आठ मिसाईल पाडण्यात आले, तसेच पाकिस्तानची रडार सिस्टिम देखील उद्ध्वस्त करण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरील दबाव प्रचंड वाढला आहे, भारतानं केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या राजकारणात देखील मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षच नाही तर पाकिस्तानच्या सैन्याकडून देखील शहबाज शरीफ यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता पाकिस्तानला वाचवण्यासाठी नवाज शरीफ यांनी पुढाकार घेतला आहे. नवाज शरीफ हे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे मोठे भाऊ आहेत. गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये देखील ते सहभागी झाले होते.

नवाज शरीफ यांचे भारतासोबतचे संबंध चांगले आहेत, भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात सुधारणा व्हावी असं त्यांनाही वाटत होतं. 1999 ची लाहोर बस यात्रा, त्यानंतर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला लाहोरचा दौरा यावरून हेच दिसून येत की, नवाज शरीफ यांचे भारतासोबत चांगले संबंध आहेत, त्यामुळे नवाज शरीफ हे पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे पाकिस्तानला काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आता पुन्हा एकदा पाकिस्तानची कमान ही नवाज शरीफ यांच्या हातात जाण्याची शक्यता आहे, भारतानं केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानवर प्रचंड दबाव वाढला आहे, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आहे. हा दबाव कमी करून परिस्थिती सुधारण्याचं मोठं आव्हान आता नवाज शरीफ यांच्यासमोर असणार आहे, त्यामध्ये शरीफ हे कितपत यशस्वी होणार हे पाहावं लागणार आहे. आता पाकिस्तानच्या राज्यकारभाराची सर्व सुत्रे नवाज शरीफ हे आपल्या हातात घेण्याची शक्यता आहे.