
GST System: आजच्या महागाईच्या काळात कोणती उपयोगी वस्तू स्वस्त होणार याकडे मध्यमवर्गीयांचे डोळे असतात. ज्यामुळे खिश्यावर पडणारा भार काही प्रमाणात हलका होईल. आता भारतात जीएसटी पुन्हा एकदा मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. केंद्र सरकारने दिलेल्या संकेतानुसार, लवकरच सध्याचे चार स्लॅब फक्त दोन कर दरांनी बदलले जातील, ते म्हणजे 5% आणि 18% …. तर दुसरीकडे तंबाकू आणि पानमसाला यांसारख्या उत्पादनांवर 40 टक्के कर असणार आहे. सरकारचा असा विश्वास आहे की, ही सुधारणा गेम चेंजर ठरेल आणि 2047 पर्यंत भारताला एकाच कर स्लॅबकडे घेऊन जाईल.
सांगायचं झालं तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वतंत्रदिनाच्या दिवशी जनतेला संबोधित करताना सांगितलं की, दिवाळीमध्ये मोठी भेट देणार आहे. मोदी म्हणाले, दैनंदिन वस्तू आणि जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा भार कमी होईल, ज्याचा थेट फायदा सामान्य कुटुंबांना आणि लहान व्यवसायांना होईल. नवीन चौकट एमएसएमई आणि लघु उद्योगांनाही बळकटी देईल यावर मोदींनी भर दिला.
सरकारी सुत्रांनुसार, सध्या 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये असलेल्या 90 टक्क्यांहून अधिक उत्पादनांचा कर 18 टक्क्यांपर्यंत कमी केला जाईल. तर 12 टक्क्यांच्या स्लॅबमधील जवळजवळ सर्व वस्तू आता 5 टक्क्यांपर्यं येतील. याचा अर्थ बहुतेक घरगुती वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू पूर्वीपेक्षा स्वस्त होतील. पण तंबाखू, पान मसाला यांसारख्या सात उत्पादनांवर 40 टक्के कर लागू राहील. पेट्रोलियम अजूनही जीएसटीच्या कक्षेबाहेर राहील, तर हिरे आणि मौल्यवान वस्तू सध्याच्या दरांनुसार राहतील.
यामध्ये प्रामुख्याने ड्राय फ्रुट, सर्व प्रकारचे पॅक केलेले स्नॅक्स, प्रक्रिया केलेले अन्न, चटणी, जॅम, जेली, पॅक केलेले नारळ पाणी, पॅक केलेला रस, 20 लिटर पॅक केलेली पाण्याची बाटली, पास्ता, पेन्सिल, टूथ पावडर, ज्यूट आणि कॉटन हँडबॅग्ज, शॉपिंग बॅग्ज, मेणबत्त्या, टॉयलेट आयटम, मच्छरदाणी, विविध प्रकारची आयुर्वेदिक आणि इतर औषधे, पास्ता, पडदे, स्वयंपाकघरातील भांडी, औषधी दर्जाचा ऑक्सिजन, कृत्रिम धागे, अॅल्युमिनियमची भांडी, क्रीडा साहित्य, फर्निचर, नट-बोल्ट, सिलिकॉन वेफर्स, रेल्वेमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू इत्यादींचा समावेश आहे.
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जीएसटी कौन्सिलमध्ये नवीन कर प्रणालीवर चर्चा होईल, ज्याचे अध्यक्षपद अर्थमंत्री निर्मला सीतारमण करतील. जर राज्यांशी एकमत झाले तर या वर्षी दिवाळीपूर्वी ही नवीन टॅक्स प्रणाली सुरु होईल.