
देशाच्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. आता बिहारमधून एक मोठी बातमी आली आहे. माजी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आरोप केला की, माझ्यावर हल्ला होऊ शकतो आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व यात सहभागी असू शकते. शकील अहमद खान यांच्या या आरोपामुळे आता संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बिहारमधील काँग्रेसचे माजी नेते शकील अहमद खान सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी, ‘काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने माझ्यावर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. काही काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी मला गुप्तपणे याची माहिती दिली आहे. माझ्या पाटणा आणि मधुबनी येथील निवासस्थानांवर पुतळा जाळण्याच्या बहाण्याने हल्ला करण्याचे आदेश बिहार युवा काँग्रेसला देण्यात आले आहेत.’ शकील अहमद खान यांच्या या आरोपांनंतर आता बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
शकील अहमद यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाष्य केले होते. त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख भित्रे असा केला होता, त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांच्या या विधानामुळे पक्षात असंतोष आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
शकील अहमद यांनी म्हटले होते की, ‘राहुल गांधी फक्त अशा तरुण नेत्यांना प्रोत्साहन देतात जे पक्षात त्यांची स्तुती करतात. काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाही नाही.’ राहुल गांधींचा उल्लेख करताना त्यांनी हुकूमशाही आणि अलोकतांत्रिक असे शब्द वापरले होते. तसेच राहुल गांधी काँग्रेसच्या वरिष्ठ सहकाऱ्यांचे ऐकत नाहीत आणि त्यांना असे वाटते की ते निर्णय घेत असल्यामुळे पक्ष दुसऱ्या स्थानापेक्षा खाली जाऊ शकत नाही.
शकील अहमद हे बिहारमधील एक ज्येष्ठ राजकारणी आहेत. ते तीन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिलेले आहेत. 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीनंतर शकील अहमद यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचवेळी त्यांनी पक्षाविरोधात भाष्यही केले होते. दरम्यान, शकील अहमद हे 2000 ते 2003 पर्यंत बिहार प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्षही होते.